आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा महाराष्ट्र ‘शिवसेनामय’ करणार – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळगाव

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचणे व पक्ष संघटनेचा विस्तार करणे हाच उद्देश असून या यात्रेमुळे महाराष्ट्र शिवसेनामय होईल असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. जळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा शुभारंभ उद्या 18 जुलै रोजी जळगाव जिल्ह्यातून होणार आहे. या यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत बुधवारी जळगावात दाखल झाले. जळगाव शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस येथे शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘शिवसेना-भाजपची युती हिंदुत्वाच्या समान धाग्यावर झाली आहे. जागा वाटप आणि दोन्ही पक्षातील समन्वय उत्तम प्रकारे ठरले आहे. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मतदान दिले त्यांचे आभार मानायचे आणि ज्यांनी मत दिले नाही त्यांचे मन जिंकण्यासाठी आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा आहे. या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व भाागात आदित्य ठाकरे जाणार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षाला शिवसेनेवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेमुळे जळगावात शिवसैनिकांमध्ये उत्साह

सत्तेत असलो म्हणजे शेतकऱ्यांच्या व जनतेच्या प्रश्नावर बोलू नाही असे कुठेही घटनेत लिहिलेले नाही. पिक विमा कंपन्या या खासगी आहेत. पिक विमा करंपन्या सत्तेच्या भागिदार नाहीत. विरोधी पक्ष कुचकामी व वैफल्यग्रस्त झाला आहे. खरेतर शेतकऱ्यांचा व जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवुन विरोधी पक्षांनी ते सोडवायला हवेत. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढाकार घेत असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.

राममंदिराच्या मुद्द्याला जागे करण्याचे काम शिवसनेने केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे दोन वेळा अयोध्येत जावून आले. लखनौ पासुन अयोध्येपर्यंत राम मंदिराचा प्रश्न कोण सोडविणार असा प्रश्न केल्यावर तेथील नागरिक ‘शिवसेना’ असे उत्तर देतात असेही राऊत म्हणाले. राम मंदिराचा मुद्दा न्याय प्रविष्ठ असून सरकार, न्यायालय या विषयात निर्णय घेईल आणी दोन वर्षात हा प्रश्न मार्गी लागलेला असेल असा एका प्रश्नाच्या उत्तरात खासदार राऊत यांनी सांगितले.

ठाकरे कुटुंबाने नेतृत्व करावे ही लोक भावना
शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे 10 वर्षापासुन युवकांसह नागरिकांमध्ये मिसळुन काम करीत आहेत. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे आश्वासक नेतृत्व आहे. ठाकरे कुटुंबियांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे ही लोकभावना असून शिवसेना पक्ष व महाराष्ट्र आदित्य ठाकरे यांच्या पाठिशी उभा असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला शिवसेना उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती.