हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन प्रीत्यर्थ संपूर्ण महाराष्ट्रात युवासेनेच्या वतीने 17 ते 30 नोव्हेंबर 2021 दरम्यान रक्तदानाच्या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर, राज्यभरात 14 दिवस रक्तदानाची भव्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
युवासेनेच्या वतीने दरवर्षी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबर हा स्मृतीदिन सामाजिक बांधिलकी म्हणून राज्यव्यापी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या वर्षीही शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा, तालुकास्तरावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्राच्या वतीने विविध कार्यशाळा
दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्राच्या वतीने बुधवार, 17 नोव्हेंबर रोजी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
कलिना पॅम्पस येथील नॅशनल सेंटर फॉर नॅनो सायन्स अॅड नॅनो टेक्नॉलॉजी इमारतीत सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत निवेदन व मुलाखत तंत्र ही कार्यशाळा होणार असून निवेदक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे चित्रकला विषयावरील कार्यशाळा सकाळी 11 ते 4 या वेळेत होणार असून सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे, प्रशिक्षण विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश तारतारे मार्गदर्शन करणार आहेत.
शिवसेनाप्रमुखांच्या महानिर्वाणदिनी वरळीत आज रक्तदान शिबीर
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 9व्या स्मृतिदिनी उद्या, 17 नोव्हेंबरला शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबीर, रुग्णवाहिका सेवा, लसीकरण मोहीम असे विविध उपक्रम राबवण्यात येतात. त्याचबरोबर अनेक शिवसेना शाखांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरेसुद्धा आयोजित करण्यात येतात. वरळी नाका येथील शिवसेना शाखेतून मागील 108 महिन्यांपासून दर महिन्याच्या 17 तारखेला रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत आहे. सातत्यपूर्ण रक्तदान शिबीर आयोजित करून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली अर्पण करणारा हा उपक्रम समाजाच्या समोर आदर्श ठरला आहे. रक्तदान शिबिरात सहभागासाठी नगरसेवक अरविंद भोसले यांच्याशी 9821581860 यावर संपर्क साधावा.


























































