
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे वक्तव्य केल्यामुळे आज रत्नागिरी जिल्ह्यात त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली. चिपळूण, रत्नागिरी आणि लांजा येथे शिवसेनेने जोरदार निषेध केला. चिपळूण येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि खासदार सुधांशु त्रिवेदी यांचे पोस्टर गाढवावर लावून शिवसेनेने संताप व्यक्त केला.
काही महिन्यांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठातील एका कार्यक्रमात कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे वक्तव्य केले. कोश्यारी यांच्या बेताल वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले आहेत. त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानास्पद वक्तव्य केले. त्याचाही निषेध शिवसेनेने केला.
View this post on Instagram
चिपळुणात गाढवावर कोश्यारींचे पोस्टर
चिपळुणात शिवसैनिकांनी आज जोरदार निदर्शने करत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते खासदार सुधांशु त्रिवेदी यांचे पोस्टर गाढवावर लावून जोरदार निषेध केला. यावेळी राज्यपालांच्या आणि खासदार त्रिवेदी यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख प्रताप शिंदे, चिपळूण विधानसभा मतदार संघ क्षेत्रप्रमुख बाळा कदम, उमेश सकपाळ, शशिकांत मोदी आणि इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धोतरातल्या राज्यपालांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय
महाराष्ट्र कुणाचा… छत्रपती शिवाजी महाराजांचा, धोतरातल्या राज्यपालांचं करायचं काय… खाली डोकं वर पाय, जय भवानी जय शिवाजी, शिवसेना झिंदाबाद अशा घोषणा देत रत्नागिरीतील शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि खासदार सुधांशु त्रिवेदी यांचा निषेध केला. यावेळी जिल्हाप्रमुख विलास चाळके, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, माजी नगरसेवक बाबा नागवेकर, नितीन तळेकर, सलील फळे, तालुका युवधिकारी प्रसाद सावंत, विभागप्रमुख महेश पत्की, माजी नगरसेविका राजश्री शिवलकर प्रकाश गुरव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख विलास चाळके म्हणाले की, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अतिशय बेताल वक्तव्य करत आहेत. आम्ही राष्ट्रपतींकडे मागणी करतो की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटवावे.

लांजामध्येही तीव्र निषेध
सुरुवातीला सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्याबददल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर नुकतेच मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोश्यारी यांनी अवमानकारक वक्तव्य केले. त्याचा तीव्र निषेध लांजामध्ये शिवसैनिकांनी केला. यावेळी शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी, उपजिल्हाप्रमुख जगदिश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, उपतालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, दिलीप पळसुलेदेसाई, तालुका महिला संघटक लीला घडशी, तालुका युवती अधिकारी दिपाली दळवी, लक्ष्मण मोर्ये, मंगेश जाधव, चेतन खंदारे, सिध्देश पांचाळ, पुर्वा मुळये, सचिन डोंगरकर, स्वरुप गुरव, लहू कांबळे, राजू हळदणकर, समृध्दी गुरव, मधुरा बापेरकर, यामिनी जाईल, दुर्वा भाईशेट्ये, चंद्रकांत शेट्ये, गणेश लाखण, सुरेश झोरे, परवेश घारे, धर्मेंद्र पालये, रवी शिखरे, प्रसाद भाईशेट्ये, दिपक कदम उपस्थित होते. यावेळी शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले. महात्मा फुले यांच्यावर वादग्रस्त विधाने करून महाराष्ट्राची अस्मिता दुखावण्याचे काम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी करत आहेत. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.




























































