होऊ द्या चर्चा’; देशातील नव्या क्रांतीची सुरुवात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभर सुरू असणारे ‘होऊ द्या चर्चा’ अभियान हे देशातील एका नव्या क्रांतीची सुरुवात आहे. सरकारच्या निव्वळ घोषणाबाजी व इव्हेंट मॅनेजमेंटबद्दल लोकांच्या मनात प्रचंड खदखद असून, त्याला कुठेतरी एक वाट मोकळी करून देण्याच्या उद्देशाने शिवसेना पक्षाच्या वतीने हे अभियान आखले गेल्याची भावना उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी मांडली.

शित्तूर तर्फ मलकापूर (ता. शाहूवाडी) येथे आयोजित संवाद सभेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव होते. ‘होऊ द्या चर्चा’ अभियानाच्या शाहूवाडी तालुक्यातील दुसऱया दिवशी वरेवाडी, नांदगाव, पेंडागळे, सावे, पिशवी, शित्तूर तर्फ मलकापूर येथे लोकांच्या मोठय़ा प्रतिसादात संवाद सभा संपन्न झाल्या.

सर्वसामान्य जनतेच्या मतांचा जोगवा पदरात पाडून घेण्यासाठी मनाला येतील ती आश्वासने द्यायची, मोठमोठय़ा घोषणा करायच्या. निरनिराळ्या योजना व सुविधा देऊ असे सांगून लोकांना किचकट प्रशासकीय बाबींची अडचण निर्माण करून त्यांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारायला लावायचे, एवढा एकमेव कार्यक्रम सत्ताधाऱयांच्या माध्यमातून सुरू असल्याची बोचरी टीकाही ज्योती ठाकरे यांनी केली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, तालुकाप्रमुख दत्ता पोवार, युवाजिल्हाधिकारी स्वप्नील मगदूम, अलका भालेकर, दीप्ती कोळेकर, पूनम भोसले, विजय लाटकर, दिनकर लोहार यांच्यासह शिवसैनिक व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शेतकऱयांशी साधला संवाद

हातकणंगले ः शाहूवाडी तालुक्यातील अभियानाच्या दुसऱया दिवशी उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी विविध भागांतील शेतकऱयांच्या बांधावर जात त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या मनात सरकारबद्दल असणारी भावना व चीड जाणून घेतली. यावेळी खते-बियाणे यांची टंचाई आहे. पण, त्याचा दर्जाही योग्य नाही. दुष्काळ-ओला दुष्काळ या चक्रात अस्मानी संकटाला तोंड देता देता सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सुलतानी संकट आले असल्याची भावना उपस्थित शेतकऱयांनी बोलून दाखवली.