घटनाबाह्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घटनाबाह्य मिंधे सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसून मराठा आरक्षणावर विधिमंडळात महत्त्वाची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर होते हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला.

मराठा आरक्षणाबाबत उदासीन असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना निशाणा साधला. मराठा आरक्षणावरील चर्चेवेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात हजर असणे आवश्यक होते; परंतु तिघांपैकी कुणीही सभागृहात उपस्थित नव्हते, याबद्दल आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. मिंधे सरकार जनसामान्यांच्या प्रश्नावर गंभीर आहे की नाही, असा सवालही त्यांनी केला.

 अवकाळीग्रस्त शेतकऱयांना कर्जमाफी मिळालेली नाही या प्रश्नावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱयांच्या बांधावर जाऊन कर्जमाफी दिली होती. स्वतŠ शेतकरीही त्याबद्दल अभिमानाने सांगतात आणि घटनाबाह्य सरकारने अद्याप कोणतीही मदत दिलेली नाही असे सांगायलाही शेतकरी घाबरत नाहीत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

सरकारने निवडणुकांचा धसका घेतलाय

पुणे आणि चंद्रपूर लोकसभेच्या पोटनिवडणुका कधी होणार? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता आदित्य ठाकरे म्हणाले की, पुणे, चंद्रपूरची लोकसभा पोटनिवडणूक असो वा मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक, सरकारने निवडणुकांचा धसकाच घेतलाय, निवडणूक आयोगही निवडणूक घ्यायला तयार नाही, अशी टीका त्यांनी केली.

म्हणून फोटोसेशनला मन झाले नाही

विधान भवनाच्या पायऱयांवर झालेल्या फोटोसेशनमध्ये आदित्य ठाकरे उपस्थित नव्हते. त्याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांना विचारले असता ते म्हणाले की, फोटोसेशनमध्ये सहभागी व्हायला मन नव्हतं. मी आधीच्या फोटोसेशनमध्ये सहभागी झालो होतो, पण आता घटनाबाह्य सरकार निर्माण झाले आहे. समोरच्या रांगेत सगळे घटनाबाह्य सरकारमधील मंत्री होते. कुठल्याही रांगेत उभे करा मला काहीच त्रास नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही मी मागच्या रांगेत उभा होतो. कुठे उभे राहायचे म्हणून मी आलो नाही, तर माझे मुळात मन नव्हते म्हणून मी आजच्या फोटोसेशनला आलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.