
एकवचनी, सत्यवचनी प्रभू रामचंद्र यांनी कोणतीही सत्ता नसताना जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले. सत्तेसाठी त्यांनी विश्वासघाताने कुणाच्या पाठीत सुरा खुपसला नाही. समोर असलेली सत्ता सोडून वचन पाळण्यासाठी ते वनवासात गेले, मात्र तिथेदेखील रावण, सुग्रीव यांचा पराभव करूनही सत्ता बळकावली नाही. याचा आदर्श आजच्या राजकारण्यांनी घेण्याची गरज असल्याचा टोला शिवसेना नेते- खासदार अरविंद सावंत यांनी आज भाजपला लगावला. संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रभू रामचंद्र मंदिरावर आयोजित चर्चेदरम्यान ते बोलत होते.
सत्तेसाठी आजच्या राजकारणात सुरू असलेल्या विश्वासघातकीपणाचा अरविंद सावंत यांनी समाचार घेतला. देशाची अस्मिता असलेले त्यागी प्रभू रामचंद्र सत्तेसाठी पित्यासोबत लढले नाहीत. त्यामुळे ‘रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम, जय रघुनंदन जय घनशाम, पतीत पावन सीताराम’ ही उपाधी समर्पक असल्याचे ते म्हणाले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी पडल्यानंतर ‘हे काम जर शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा अभिमान आहे,’ अशी प्रतिक्रिया देत जबाबदारी स्वीकारल्याची आठवणही त्यांनी करून दिली. राम मंदिर न्यायालयाच्या आदेशाने झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. राम मंदिर होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील ‘मंदिर वही बनायेंगे, मगर तारीख नही बतायेंगे’ असे म्हणत मंदिर निर्माणासाठी प्रोत्साहन दिल्याचे ते म्हणाले. हिंदुत्वाची घोषणा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम केली आणि विलेपार्ल्याची निवडणूक शिवसेनेने 1987 मध्ये जिंकल्याची आठवणही त्यांनी करून दिली. भाजपने यानंतरच हिंदुत्वाची कास धरल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.






















































