भाजपची कीड मारावीच लागेल! उद्धव ठाकरे यांचा तडाखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरदार, कुटुंबावर निखारे ठेवून पक्ष वाढवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर आता उपरे, बाजारबुणगे आणून बसवले जाताहेत. हे तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल करतानाच महाराष्ट्रातून भाजपची कीड मारावीच लागेल, असा तडाखा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला.

भिवंडीतील भाजपचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज कमळाबाईला रामराम करून हाती शिवबंधन बांधले. त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. काळ पडता असतो तेव्हा भविष्यकाळ चढता असतो. शिवसेना पडलेली नाहीच आहे. शिवसेनेशी गद्दारी केली गेली आणि गद्दार आता चढलेत, पण जो चढलाय तो पडणार आणि पडणारच, असे उद्धव ठाकरे म्हणताच ‘मातोश्री’चा परिसर शिवसेनेच्या जयघोषाने दुमदुमला.

राज्यात आपण कुटुंब संवादाला सुरुवात केली असून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत. नुकताच आपण कोकणचा दौरा केला. त्यात दिसले की, महाराष्ट्रात चोरबाजार आणि गद्दारांविरुद्ध भयंकर चीड आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आता जी गुंडागर्दी आणि पह्डापह्डी सुरू आहे त्यासाठीच तुम्ही तुमचे आयुष्य पक्षासाठी खर्ची घातले का? बाहेरची माणसे तुमच्या डोक्यावर आणून बसवली जाताहेत. हे भाडोत्री हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे काय? असा सवालही त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना केला. त्यावर ‘‘नाही’’ असे उत्तर देत उपस्थित कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधलेले हात उंचावत शिवसेनेचा जयघोष केला.

भिवंडीतील शेकडो भाजप कार्यकर्ते शिवबंधनात

‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडला. भाजपचे भिवंडी विधानसभा निवडणूक प्रमुख दशरथ पाटील यांनी त्यांचे शेकडो समर्थक, सरपंच, उपसरपंच यांच्यासह शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. पडत्या काळात शिवसेनेला साथ देण्यासाठी आम्ही जिवाचे रान करू, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी शिवसेना नेते-आमदार भास्कर जाधव आदी उपस्थित होते.

चोराएवढीही नैतिकता भाजपात नाही

न्यायाधीश बनलेल्या एका चोराचा किस्सा सांगत उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर शरसंधान केले. ते म्हणाले की, खोटी कागदपत्रे बनवून न्यायाधीश बनलेल्या एका चोराने कोर्ट सुट्टीवर असताना अनेक चोरांना सोडून दिले होते. असे झालेच कसे म्हणून सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्या चोराला विचारण्यात आले तेव्हा त्याने कबुली दिली की, मी फक्त थातूरमातूर चोऱया करणाऱयांना सोडले. खून, दरोडे, बलात्कार करणाऱयांना सोडले नाही. त्या चोरामध्ये होती तेवढीही नैतिकता आज भाजपमध्ये राहिली नाही, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.