महविकास आघाडी 40 हून अधिक जागा जिंकणार, संजय राऊत यांचा ठाम विश्वास

देशात 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सर्व्हे समोर आला आहे. त्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महायुतीला 19 ते 21 जागा तर महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, आम्ही जी तयारी केली आहे ती किमान 35 ते 40 जागा जिंकण्याची. हा पहिला सर्व्हे असेल त्यांचा. अनेक प्रमुख लोकं लोकसभेच्या दृष्टीने अजून शिवसेनेत आणि महाविकास आघाडीत प्रवेश करत आहेत. ती गणितं बदलणार आहेत. किमान 40 जागा लोकसभेच्या जिंकू असा आम्हाला आत्मविश्वास असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपचे मिशन 45 वर बोलताना संजय राऊत म्हणाले, भाजप मिशन 145 पण करु शकतं. भारतीय जनता पक्षाचे काही सांगू नका. ते देशामध्ये 1000 जागा जिंकतील आणि महाराष्ट्रामध्ये 148 जिंकतील असा टोला लगावला आहे. पुढे ते म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा हवेतील पक्ष हा जनतेचा पक्ष नाही. जे पक्ष दोन कुबड्यांवरती उभे आहेत. त्या मिंदे आणि अजित पवार यांनी 45 जागा जिंकण्याची भाषा करावी हे हास्यास्पद आहे. तुम्ही स्वत:च्या ताकदीवरती बोला. तुम्ही कुठे आहात? हे सर्व्हे वगैरे बाजुला ठेवा. मी महाविकास आघाडीच्यावतीने सांगतो. आमची 40 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची क्षमता आहे. तुम्ही सर्व्हे करा, नका करु, कोणालाही काही बोलू द्या पण आम्ही सर्व्हे करत नाही. पण आमचे 40 प्लस हे मिशन नसून आत्मविश्वास आहे.

प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्याच्यामुळे हुकूमशाहीचे हात बळकट होतील.

बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरु आहे. त्यांच्या आणि आमच्या भूमिकेत फरक नाहीय. बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने जाणारे त्यांचे नातू आहेत. या देशामध्ये संविधान टिकावं, या देशामध्ये लोकशाहीची हत्या होऊ नये, या देशातला कायदा पायदळी तुडवला जाऊ नये. या देशामध्ये मोदींची हुकूमशाही संपवावी आणि लोकशाही मार्गाने संपवावी असे मानणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत. आमची आणि त्यांची जी चर्चा झाली त्यात ते सकारात्मक होते. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते लवकरच एकत्र बसणार आहोत. काँग्रेसचा स्थापना दिवस असल्याने 28 तारीखपर्यंत तिकडचे नेते व्यस्त आहेत. त्यामुळे ही जी निर्णायक बैठक आहे ती 28 नंतर होईल. त्यात 100 टक्के हा निर्णय होईल. प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्याच्यामुळे हुकूमशाहीचे हात बळकट होतील. प्रत्येकजण आपआपला पक्ष वाढवतो, संघटना वाढवत असतो. प्रकाश आंबेडकर हे जर त्यांच्या पक्षाचा किंवा आघाडीचा विस्तार करत असतील तर त्याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखे काही कारण नाही. आपण जर सातत्याने पाहिले असेल की, शिवसेनेच्या बरोबरीने जर कोणी या महाराष्ट्रामध्ये मोदींच्या हुकूमशाहीवर जोरदार हल्ले करत असतील, जर त्या दृष्टीने पावले टाकत असतील तर ते प्रकाश आंबेडकर आहेत हे विसरता येणार नाही. कारण त्यांच्या संविधान बचाव संघर्ष असेल किंवा हुकूशाही विरुद्ध त्यांच्या भूमिका असतील या अत्यंत स्पष्ट आणि परखड आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि संविधान यांच्यासंदर्भात ते कोणतीही चूकीची भूमिका घेतील असे या महाराष्ट्राला देशाला वाटत नसल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

अयोद्धेचा सातबारा रामाच्या नावावर आहे भाजपच्या नावावर नाही

रामलल्ला ही काय तुमची प्रॉपर्टी आहे का असा भाजपला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारला होता, त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, यात उद्धव ठाकरे चूकीचे काय बोलले? जर आमच्या पक्षाचे प्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांनी हा प्रश्न केला आहे. तो प्रश्न बरोबर आहे, प्रत्येकवेळेला ते रामल्लाच्या नावाने मतं मागतात. जणूकाय राममंदिराची मालकी यांच्याकडेच आहे. अशापद्धतीने त्यांचे राजकारण सुरु आहे. म्हणजे त्यांची ती प्रॉपर्टी आहे का ? हा एक प्रश्नच आहे. राममंदिरासाठी सगळ्यात मोठं दान दिलं असेल तर ते शिवसेनेने दिले आहे. त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी अय़ोद्धेत जाऊन शिवसेनेच्यावतीने 1 कोटी रुपये दिले. ट्रस्ट स्थापन होताच पहिली देणगी ही शिवसेनेची आहे. त्यामुळे रामलल्ला हे कोणाच्या मालकीचे येत नाही. अयोद्धेचा सातबारा रामाच्या नावावर आहे भाजपच्या नावावर नाही. भारतीय जनता पक्षाने फेरफार करुन आपलं नाव टाकलं आहे का? उद्धव ठाकरे यांनी सांगितलेय की, सारखे सारखे जे रामलल्लाच्या नावाने जे राजकारण सुरु आहे. आम्ही मंदिर बनवले सांगतात मग आम्ही काय केले? रामलल्ला कोणाची खासगी संपत्ती नाही. रामलल्ला देशाची अस्मिता आहे. हे भारतीय जनता पक्ष रामलल्लाचे अपहरण करु इच्छित आहेत. नेहमीप्रमाणे त्यांचे ते तंत्र आहे. अयोद्धेचा सातबारा त्यांच्या नावावर नाही. ते देशाचे आहे. सांभाळून काम करा. जेव्हा ट्रस्ट झाला होता त्यावेळी शिवसेना पहिला पक्ष होता ज्याने 1 कोटी सर्वात मोठं दान केले होते.

हुकूमशाही विरोधातील लढा अधिक तीव्र व्हावा असे मानणाऱ्यांपैकी प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर आणि आम्ही एकत्र बोलत आहोत. जागावाटपासंदर्भात काही चर्चा मागे पुढे होत आहेत. प्रकाशजींच्या ज्या भूमिका आहेत त्या मोदींच्या बाबतीत ते अत्यंत परखड आहेत. हुकूमशाही विरोधातील लढा अधिक तीव्र व्हावा असे मानणाऱ्यांपैकी प्रकाश आंबेडकर आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आणि भूमिका जी लोकशाही संदर्भातील आहे, त्यासंदर्भात ते अत्यंत काळजीपूर्वक पावले टाकतायत. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना हे एकत्र आहेतच. आम्ही दोघांची युती जाहीरही झाली आहे पण भविष्यात महाविकास आघाडी, इंडिया ब्लॉकमध्ये त्यांना कसे सामावून घेतले जाईल. त्यासंदर्भात इंडियाच्या बैठकीत स्वत: उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा चर्चेला आणला होता. आमची जेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधींशी भेट झाली. त्यावेळी मी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे होतो. आमची जेव्हा राहुल गांधी, सोनीया गांधी यांच्यासोबत भेट झालीय तेव्हा सुद्धा प्रकाश आंबेडकर यांना आपण त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला इंडिया ब्लॉकमध्ये सामावून घेणे गरजेचे आहे. हे आम्ही त्यांना पटवून दिलेले आहे. त्यामुळे मला असे वाटत नाही काँग्रेसचा त्याला विरोध आहे, शरद पवार यांचाही विरोध नाही. कोणाचाही विरोध नाही. प्रकाश आंबेडकरांची ताकद ही महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉकसोबत असावी. अशामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे एकमत असल्याचे संजय राऊत यांनी व्यक्त केले.

यावेळी काश्मीरच्या मुद्द्यावरही संजय राऊत यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली ते म्हणाले,  काश्मीरची स्थिती 370 कलम हटवल्यानंतरही ठीक नाहीय, हे संपूर्ण देश जाणतो. आजही एका निवृत्त एसीपीची हत्या झाली. पूंछमध्ये हल्ला झाला आणि आपले पाच जवान शहीद झाले. आपले जवान सुरक्षित नाहीयत. सुरक्षाकर्मी सुरक्षित नाहीत. पोलिसांच्या हत्या होत आहेत. हे सरकार काश्मीरची परिस्थिती सुधारली आहे हे कोणत्या आधारावर बोलत आहे?. हे खरंच की मेहबुबा मुफ्ती या तेथील स्थानिक नेत्या आहेत. त्या काश्मिरच्या नेत्या आहेत. आमच्यामध्ये काही मतभेद होऊ शकतात. मात्र ही गोष्ट खरी आहे की, पूंछचा हल्ला हा पुलवामाची पुनरावृत्ती होती. त्याचप्रकारे हल्ला झाला. याला जबाबदार कोण आहे? गेल्या तीन चार महिन्यात जवळपास पंचवीसहून अधिक मोठ्या आर्मी अधिकाऱ्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. जबाबदार कोण? सरकार संपूर्णपणे निवडणुकीत, शपथविधीत व्यस्त आहेत, मुख्यमंत्री बदलण्यात व्यस्त आहेत. विरोधकांवर हल्ला करण्यात व्यस्त आहेत. ईडीचा दुरुपयोग करण्यात व्यस्त आहेत. मग काश्मीरकडे कोण बघणार.? काश्मीरची हालतच कोण सुधारेल याबाबत कोणी बोलले का?