Lok Sabha Election 2024 : दिल्लीत व गल्लीत येस सर करणारे खासदार नकोत, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

”आपल्याला दिल्लीत आणि गल्लीत येस सर, येस सर करणारे खासदार नको आहेत. आपल्याला दिल्लीत जाऊन डरकाळी फोडणारे वाघ आपल्याला हवे आहेत”, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे भाजपवर केला आहे. भांडूप येथील शाखा भेटीच्या वेळी भाषण करताना त्यांनी भाजप मिंधेंची सालटी काढली.

”अडीच वर्ष भाजप मिंधेंनी राज्याची वाट लावली आहे. त्यांनी जे काही चुकीचं केलं तिथेच आपला प्रचार झाला. संपूर्ण महाराष्ट्र आपल्यासोबत आहे. हे चित्र मला संपूर्ण देशात दिसत आहे. मार्चच्या 31 तारखेला आम्ही दिल्लीत होतो. दिल्लीत याआधी निवडणूका झाल्या तेव्हा तेथील जनतेची केंद्रात भाजप व स्थानिक सरकारमध्ये अरविंद केजरीवाल अशी भूमिका होती. आता दिल्लीतही सातही जागा आप व काँग्रेस जिंकणार असं चित्र आहे. तिथेही कुणाला हुकुमशाही नकोय. जम्मू कश्मीरमध्ये सहा जागांसाठी वेगवेगळ्या दिवशी मतदान आहे. 370 नंतर जर जम्मू कश्मीरमध्ये काही चांगलं झालं असतं तर वेगवेगळ्या दिवशी मतदान घ्यायची गरज लागली नसती. आपल्याला वाटलेलं जम्मू कश्मीर अधिक सुरक्षित होईल पण काहीच झालं नाही. तिथे लड़ाखमध्ये सोनम वांगचूक उपोषणाला बसले आहेत. त्यांची एकच मागणी आहे की केंद्र सरकारने 2020 मध्ये जे आश्वासन दिलं ते पूर्ण करा. कुणाचीच आश्वासनं पूर्ण होत नाहीएत. बिहारमध्येही तेजस्वी यादव आपल्यासारखी लढाई देत आहेत. नितीश कुमारांनी त्यांच्यासोबत गद्दारी केली. पाठीत खंजीर खुपसला. तिथेही आरजेडी जास्त जागा मिळवेल. महाराष्ट्रात आपल्या जागा येणार असतील. दिल्लीत आप काँग्रेस जागा जिंकणार असेल. तर मग यांचं 400 पार कसं होणार, असं आदित्य ठाकरे यांनी सुनावले

”आपण मुंबईत प्रत्येक मतदारसंघात सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. पलिकडे आतापर्यंत दोन उमेदवार घोषित केले आहेत. ते देखील मुंबई विरोधी काम करणारे आहेत. पियूष गोयल दहा वर्ष मंत्री होते. या दहा वर्षात कधीतरी मुंबई महाराष्ट्रासाठी आवाज उठवलाय कास त्यांनी? दहा वर्षात ते संसदेत काही बोलले आहेत महाराष्ट्रासाठी. आता देखील प्रचार करताना बोलतात मुंबईला स्लम फ्री करू. मुंबई स्लम फ्री व्हावी असे आम्हालाही वाटते. पण त्या झोपडपट्टीवाल्यांचं ते जिथे आहेत तिथेच पुर्नवसन झालं पाहिजे. त्यांना त्यांच्याच भागात घर मिळालं पाहिजे याला म्हणतात विकास. यांना झोपडपट्ट्यांमधील लोकांना वसई विरारच्या मिठागरात हलवायचे आहे. सर्व स्लम सोसायट्यांना वसई विरार पालघरला जातील. जिथे विकास होऊ शकत नाही तिथे घेऊन जाणार आहेत. हल्ली यांनी विकसित भारतची नवीन टेप सुरू केली आहे. स्थानिकांना नोकऱ्या मिळत नाही. सर्व प्रोजेक्ट गुजरातला घेऊन गेले आहेत. तरीही इथे रोजगार आहे. त्यामुळे यांना इथल्या स्थानिकांनाच इथून हटवायचे आहे. मुंबईतला सर्व रोजगार बाहेर घेऊन जायचा आहे. भाजपचा वचननामा नाही एप्रिल फूलचा जुमला आहे. आज जेव्हा आपण मुंबई म्हणून विचार करतो तेव्हा इथे हायराईज इमारती आहेत, कोळीवाडे आहेत, चाळी आहेत तसंच झोपडपट्ट्याही आहेत. त्या देखील आपल्याला महत्त्वाच्या आहेत. कारण मुंबई जे देशाचे अर्थ चक्र चालवते त्यासाठी इथला प्रत्येक मजदूर महत्त्वाचा ठरतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

यावेळी भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी भाजपचे उमेदवारी मिहीर कोटेचा यांचा खोटेपणा देखील उघड केला. ”मिहीर कोटेचा खरं कधी बोलतात खोटं कधी बोलतात तेच कळत नहाी. यांचं आडनाव खोटेचा करायला हवं. आम्ही जेव्हा फर्निचर घोटाळा झाला असं उघड केलं तेव्हा मिहीर कोटेचा यांनी फर्निचर घोटाळा झाल्याचे मान्य करत त्याबाबत एक पत्र लिहलं होते. तेच मिहीर कोटेचा मागच्या वर्षी विधानभवनात खोटं बोलले. हाऊसमध्ये त्यांनी स्ट्रीट फर्निचरचं टेंडर रद्द केल्याचं सांगितलं. ते मंत्री देखील नव्हते मग कोणत्या हक्काने सांगितलंत. आजही ते टेंडर आपल्यामुळे थांबून आहे. मिहीर कोटेचा तुम्ही खोटं का बोललात. अशा खोटं बोलणाऱ्यांना तुम्ही दिल्लीत पाठवणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच यंदा दिल्लीत बदल करायची सुवर्ण संधी जनतेला मिळाली आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.