अगोदर सीमावादावर बोला, नंतरच समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करा! उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकचे मुख्यमंत्री दररोज अरेरावीची भाषा करत आहेत. महाराष्ट्रात भाजपच्या ढेंगीखाली बसलेले मिंधे सरकार जणू काही सीमाभागात मराठी माणूस राहतच नाही अशा आविर्भावात आहे. ज्यांनी सीमाप्रश्नी तीन महिन्यांचा कारावास भोगला, त्या बाळासाहेबांच्या नावाने असलेल्या रस्त्याचे उद्घाटन नंतर करा, अगोदर सीमाप्रश्नावर भूमिका स्पष्ट करा. त्या कानडी मुख्यमंत्र्यांच्या दंडेलीवर बोला, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले, त्यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी गर्जना झाली.

जालना जिह्यातील घनसावंगी येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली.  सीमाभागात मराठीवर होणारा अत्याचार हा जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे मराठी माणूस राहतो, त्याच्यावर होणारा अत्याचार आहे. आम्हाला कानडीचा दुस्वास नाही. पण किती अरेरावी, किती मुजोरी. त्याला काही मर्यादा आहे की नाही? शिवसेना खासदार सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले तर बोम्मई म्हणाले, ‘अमित शहांना बोलून उपयोग नाही.’ कुणाच्या आधारावर ही दंडेली चालली आहे? यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट भूमिका मांडलीच पाहिजे, असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

न्यायव्यवस्थाही बुडाखाली घ्यायची आहे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी साहित्यिकांना लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, असे आवाहन केले होते. तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळवायचे होते. आज मिळालेले स्वातंत्र्य टिकवायचे आहे. देशाचा अमृतमहोत्सव सुरू आहे. पण देशात खऱ्या अर्थाने लोकशाही रुजली का? असा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. कारण दररोज लोकशाहीला धोक्यात आणण्याचे काम होत आहे. आता तर न्यायव्यवस्थाही सरकारला बुडाखाली घ्यायची आहे. न्यायमूर्तींच्या नेमणुकांचे अधिकारही यांना हवेत. पंतप्रधान बोले सो कायदा! कायदामंत्री, राज्यसभेचे उपसभापती न्यायालयाबद्दल बोलतात. पण आम्ही काही बोललो की न्यायालयाचा अपमान आणि हे बोलले की सगळे चिडीचूप! ही असली लोकशाही मला मान्य नाही, तुम्हाला मान्य आहे का? धोरण फसले म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी 45 दिवसांत राजीनामा दिला. आता 8 वर्षांनंतर आमच्याकडे नोटाबंदीवर चर्चा सुरू झाली आहे. निकाल लागणार केव्हा, ज्यांनी हा निर्णय घेतला तेव्हा ते सत्तेवर असतील का? कधी मिळणार या प्रश्नांची उत्तरे? ही असली जीवघेणी लोकशाही काय कामाची, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

साहित्यिकांनो, नैराश्याचे ढग हटवा

समाज सध्या सत्य-असत्याच्या भोवऱ्यात फसला आहे. नैराश्याचे ढग दाटून आले आहेत. अशा परिस्थितीत साहित्यिकांनी हे मळभ दूर करून जीवन हे अतिशय सुंदर आहे, वाईट नाही हे सांगितले पाहिजे. झोपलेल्या समाजाला जागे करण्याचे काम साहित्यिकांनी करावे, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. माझे आजोबा, माझे वडील यांनी समाजमनाचा वन्ही चेतविण्याचे काम केले. तुमच्याकडे अद्वितीय अशी लेणी आहेत. हे शिल्पवैभव चिरंतन नाही ते कधी ना कधी भग्न होणारच, पण या मातीतून आलेला संतांचा विचार चिरंतन आहे, अक्षय्य आहे. तुकोबाचे अभंग बुडाले नाहीत. ते समाजाचे काव्य बनले. हीच परंपरा, हाच वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शब्दांचा अंगार फुलवा

साहित्यिकांच्या शब्दांत प्रचंड ताकद असते. वंदे मातरम् आणि महात्मा गांधी यांनी दिलेल्या ‘चले जाव’ या दोन शब्दांनी स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात सोनेरी पान लिहिले. या दोन शब्दांची ताकदच अशी होती की, इंग्रजही हादरले. शब्दांची ताकद, महती सांगताना उद्धव ठाकरे यांनी तुकोबारायांच्या

शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल

शब्दांचे हे जंगल, जागृत राहावे।

बोलावे नेमके, नेमके खमंग खमके

ठेवावे भान, देश काळ पात्राचे।

या अभंगाचे उदाहरण दिले. विचारांचे जे दारिद्रय़, अमंगल सध्या आले आहे, ते घालवण्यासाठी साहित्यिकांनी आपल्या लेखण्या परजाव्यात. न भीता, न घाबरता वास्तव समाजासमोर आणण्याचे काम करावे. या संमेलनाचा हेतूही हाच आहे. साहित्यिक हा समाजमनाची मशागत करणारा असतो. विचारांची बिजे रोवण्याचे काम तो करतो. पण त्याचबरोबर तो माणूसही असतो. त्यामुळे त्याने माणसाची भाषा बोलली पाहिजे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची व्यथा साहित्यिकांशिवाय कोण चांगली मांडणार? असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष शिवाजीराव चोथे, साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, नियोजित अध्यक्ष शेषराव मोहिते, शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे, खासदार अनिल देसाई, संजय जाधव, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब आदींची उपस्थिती होती.

तुमच्या भिकेची गरज नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले या थोरपुरुषांच्या समाजसेवेला भीक ठरविणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचाही उद्धव ठाकरे जोरदार समाचार घेतला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आहात. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करत आहात. भीक मागा आणि बघा काही करता आले तर! मुळात तुम्ही कोण आम्हाला सांगणारे? काय तुमचा अधिकार? तुमच्या भिकेची आम्हाला गरज नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांना फटकारतानाच उद्धव ठाकरे यांनी  कुसुमाग्रज यांच्या कवितेतील नाही पसरला कर, कधी मागावयास दान, स्वर्णसिंहासनापुढे कधी लवली ना मान या ओळी वाचून दाखविल्या.

नुकसान राजाचे नाही राज्याचे

प्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘राजा, तू चुकत आहेस’, असे थेट सांगण्याचे धाडस दाखवले. आता कुणीही येतो आणि आमच्या दैवतांवर, श्रद्धास्थानांवर वाट्टेल ते बोलतो. होय, आहेत आमची ही श्रद्धास्थाने. शतकानुशतके या दैवतांनी दिलेल्या संस्कारावरच महाराष्ट्र पुढे चालत आला आहे. हेच आदर्श मोडीत काढण्याचे पाप सध्या करण्यात येत आहे आणि त्याबद्दल कुणीही काही विचारत नाही. पण आम्ही थंड रक्ताचे नाहीत. आम्ही जाब विचारणारच! साहित्यिकांमध्ये, त्यांच्या शब्दांमध्ये ही धार आहे. ही ताकद त्यांनी दाखवली पाहिजे. आमचे चुकत असेल तर जरूर कान धरा, पण ‘राजा तू चुकत आहेस’ हे सांगण्याचे धाडस करून वास्तव समाजासमोर आणा, असे कळकळीचे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी साहित्यिकांना केले. हे आपण केले नाहीत तर यात नुकसान राजाचे नाही राज्याचे आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सीमाप्रश्नावर तीन महिन्यांचा कारावास भोगला आहे. त्यांचे नाव समृद्धी या महामार्गाला देण्यात आले आहे. अगोदर सीमाप्रश्नावर भूमिका स्पष्ट करा, नंतरच महामार्गाचे उद्घाटन करा. बाळासाहेबांचे नाव सांगणारी एक सेना ढेंगीखाली घेऊन बसलात. सीमाप्रश्नावर त्यांचे तोंड का बंद आहे?

छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर ही आमची दैवते आहेत. आमच्या श्रद्धास्थानांवर कुणीही यावे आणि घाला घालावा हे खपवून घेतले जाणार नाही. याचा जाब आम्ही विचारणारच, पण साहित्यिकांचे शब्दही शस्त्र झाले पाहिजेत. ‘राजा तू चुकत आहेस’ हे सांगण्याचे धाडस दाखवलेच पाहिजे.

लोकशाही संपली हे जाहीर करा

देश म्हणजे नुसता दगडमातीचा नसतो. देशातील माणसे म्हणजे देश! पूर्वी कलाकार, साहित्यिकांना राजाश्रय होता. आताही कलेला राजकारणाचा आश्रय मिळाला पाहिजे. पण त्यात पूर्वग्रह नसावा, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करतानाच हिटलरच्या छळछावणीचे उदाहरण दिले. छावणीतील दोन पैदी बाहेर पडले. त्यापैकी एका पैद्याने तुरुंग कसा चांगला होता हे सांगितले. दुसऱ्याला विचारले तर त्याने तुरुंगात भोगलेला छळ सांगितला. तो पुन्हा तुरुंगात गेला. कारण त्याने सत्य सांगितले होते. लोकशाही अशी असेल तर ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही देत असलेल्या मताची पिंमत खोक्यात होत असेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते! मतांची पिंमत भावनेत झाली पाहिजे. नाहीतर सुरत, गुवाहाटी, गोवा अशी ट्रव्हल्स एजन्सी काम करते! कशाला हवी अशी लोकशाही! त्यापेक्षा  हिंमत असेल तर देशातील लोकशाही संपली असे जाहीरच करा ना, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.