कचऱयाच्या ढिगाऱयावर बसून आंदोलन

घर, गल्ली, रस्त्यांची स्वच्छता ठेवा, असे आवाहन करून केंद्र सरकारने रविवारी ‘स्वच्छता ही सेवा’ ही एक तासाची तर राज्य सरकारच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी एक दिवसाची तोंडदेखली स्वच्छता मोहीम राबवली. मात्र, ही मोहीम राबवत असताना मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या धारावीच्या स्वच्छतेकडे केंद्र, राज्य आणि मुंबई महापालिकेने साफ दुर्लक्ष केले जात असल्याचा भंडाफोड संतप्त धारावीकरांनी आज कचऱयाच्या ढिगाऱयावर बसून आंदोलन करत केला. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनानंतर काही तासातच येथील कचाऱयाच्या ढिगारे पालिकेकडून उचलण्यात आले.

आशिया आणि मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीने गेल्या एक-दोन वर्षांत स्वच्छता आणि आरोग्यावर भर देत कोरोनासारख्या महाभयंकर साथीविरोधात यशस्वी लढा दिला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांनी धारावीकरांनी कोरोनाला फक्त रोखले नाहीच तर कायमचे हद्दपार केले. मात्र आता धारावीतील गोपीनाथ कॉलनीनगर क्रमांक एकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलला न गेल्यामुळे सर्वत्र बकालपणा आला होता. पावसाळा आणि त्यात पुन्हा कचरा, त्याची दुर्गंधी, बकालपणामुळे साथीच्या आजारांना निमंत्रण देण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. याची गंभीर दखल घेत माजी नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी, शिवसेना विभाग संघटक विठ्ठल पवार, शाखाप्रमुख किरण कल, शाखा समन्वयक संतोष पोट, दीपक गणेचर, सत्ताभाई आणि युवासेना पदाधिकाऱयांनी कचऱयाच्या ढिगावर धरणे देत पालिकेला कचरा उचलायला भाग पाडले.

दरदिवशी कचरा उचलला जात नाही 

धारावीसह गोपीनाथ कॉलनीनगरमधील कचरा दरदिवशी उचलला जात नाही. कॉलनीमधील जुन्या कचराकुंडीच्या ठिकाणी मुंबई महापालिकेने दवाखाना सुरू केला आहे. त्यामुळे त्या ठिकाणची कचराकुंडी हलवून क्रमांक एकच्या ठिकाणी आणण्यात आली आहे, मात्र नवीन कचराकुंडीकडे मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे. दरदिवशी कचरा उचलला न गेल्यामुळे इथे बकालपणा येऊन दुर्गंधी पसरली होती. मात्र, शिवसेनेच्या आजच्या आंदोलनामुळे या पुढेही कचरा वेळेवर उचलू, दरदिवशी साफसफाई ठेवू, असे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱयांनी शिवसेना पदाधिकाऱयांना दिले आहे.