
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काँग्रेसमध्ये आज सर्वजण निराश आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या नैराश्यातून पक्ष बाहेर आलेला नाही. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या रणछोड गांधी बनले आहेत. त्यांनी स्वतः अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता अध्यक्षच ‘रणछोड’ असल्यावर पक्षातील इतर नेते आणि आमदारही त्यांचेच अनुकरण करत आहेत. अशा परिस्थितीमुळे कर्नाटकातील सरकार स्वतःच्याच ओझ्यामुळे कोसळले, तर त्यांना कोण वाचवणार असा टोला शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसला लगावला आहे.
कर्नाटकमध्ये भाजपने सत्तास्थापनेची तयारी केली आहे का, असे विचारल्यावर ते म्हणाले, सरकार कोसळल्यानंतर राजकीय परिस्थितीत योग्य असेल तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या 8 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामा दिल्याने कर्नाटतील सरकार संकटात सापडले आहे. या राजीनाम्यांबाबत 9 जुलैला निर्णय घेणार असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले आहे. 225 सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेस जेडीएस आघाडीकडे 118 आमदार होते. तर बहुमतासाठी 113 आमदारांची गरज असते. आता 11 आमदारांनी राजीनामा दिल्याने आघाडीकडे 107 आमदार आहेत. तर भाजपचे 105 आमदार आहेत. आघाडीतील राजीनामा दिलेल्या आमदारांनी भाजपला साथ दिल्यास कर्नाटकात सत्ताबदल होण्याची शक्यता आहे.
माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी नुकतेच कर्नाटकात मध्यावधी निवडणुका होण्याचे संकेत दिले होते. काँग्रेसच्या वागणुकीसमुळे सरकार कोसळू शकते असा इशाराही त्यांनी दिला होता. कर्नाटकातील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसला टोला हाणला आहे.






















































