
सामना प्रतिनिधी, मुंबई
- दक्षिण-मध्य मुंबई
दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप, आरपीआय व दलित पँथर महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी रविवारी संध्याकाळी दादरच्या कामगार क्रीडा मैदानात महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राहुल शेवाळे यांना दक्षिण- मध्य मुंबईतून पुन्हा एकदा लोकसभेत पाठविण्याचा निर्धार केला.
या मेळाव्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, उपनेते सूर्यकांत महाडिक, उपनेते सुबोध आचार्य, आमदार सदा सरवणकर, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार, आमदार प्रसाद लाड, भाजप जिल्हा अध्यक्ष अनिल ठाकूर, नगरसेविका राजश्री शिरवाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, माजी महापौर श्रद्धा जाधव, आरपीआयचे पदाधिकारी सिद्धार्थ कासारे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. खासदार शेवाळे यांनी कोळीवाडय़ांच्या विकासात बाधा आणणारा सीआरझेड हटवण्यासाठी संसदेत मागणी केली. त्यामुळे शेवाळे यांना प्रचंड बहुमतांनी पुन्हा निवडून आणण्याचा संकल्प शिवसेना-भाजप महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आला.
- उत्तर-पश्चिम मुंबई
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या गटप्रमुख-बुथप्रमुख आणि प्रमुख कार्यकर्ता, पदाधिकाऱयांच्या मेळाव्याचे अंधेरीच्या पंपहाऊस, शेर-ए-पंजाब कॉलनी याठिकाणी आयोजन करण्यात आले होते. महायुतीचे उमेदवार शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांच्या प्रचारानिमित्त हा मेळावा भरवण्यात आला. शिवसेनेने या मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत मोठय़ा प्रमाणावर विकासकामे केली आहेत. त्यामुळे मतदार महायुतीच्याच पाठीशी असून महायुतीच्याच उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन यावेळी शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार, राज्यमंत्री रविंद्र वायकर, विद्या ठाकूर, विभागप्रमुख , आमदार अनिल परब, सुनिल प्रभू, आमदार रमेश लटके, अमित साटम, भारती लव्हेकर यांच्यासह रिपाइं (आठवले) गटाचे नेते प्रकाश जाधव उपस्थित होते. यावेळी अंधेरी पूर्वेकडील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले. शिवसेना-भाजपा युतीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून कीर्तिकर यांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना करण्यात आले.




























































