
‘आमचे हिंदुत्व जनतेचे आहे. लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी आम्ही लढत आहोत. आमची भूमिका योग्य वाटेल ते आमच्यासोबत येतील,’ असे नमूद करत शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज भाजप आणि शिवसेनेतून गद्दारी करणाऱया आमदारांवर जोरदार शब्दांत हल्ला केला. गद्दार आमदारांची अवस्था काय होणार ते लवकरच दिसेल. ही त्यांची व्हीआरएसच ठरणार आहे. पुढच्या निवडणुकीत या चाळीस जणांना तिकीटही मिळणार नाही. भाजप तिथे दावा सांगेल, असे आदित्य म्हणाले.
‘मटा कॅफे’मध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. शिवसेना सत्तेत असताना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बंडाची चाहूल नेतृत्वाला लागली नव्हती का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला तेव्हा एक-दीड वर्षापूर्वी बंडाची कुणकुण लागल्याचे त्यांनी सांगितले. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, उद्धवजींनी शिंदेंना ‘मातोश्री’वर बोलावलं होतं. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का? तुमची तशी इच्छा असेल तर मला सांगा. मी बाजूला होतो. तुम्ही जबाबदारी स्वीकारा, असं उद्धवजी त्यांना (शिंदेंना) म्हणाले. त्यावेळी शिंदेंनी अश्रू ढाळले होते. आपली अशी कोणतीच इच्छा नसल्याचं ते म्हणाले होते.
आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो तेव्हा आम्हाला सातत्यानं सांगितलं जायचं त्या दोन्ही पक्षांकडे लक्ष ठेवा. ते कधीही पाठीत खंजीर खुपसतील. मात्र प्रत्यक्षात आमच्याच माणसांनी पाठीत खंजीर खुपसला. त्यांच्यावर आम्ही पूर्ण विश्वास टाकला, हीच आमची चूक झाली, असे आदित्य ठाकरे पुढे म्हणाले.
मित्रालाच संपवायचा विचार ते करत असतील तर…
भाजपचा वाईट काळ असताना, ते सरकारमध्ये नसताना शिवसेना, शिरोमणी अकाली दल हे पक्ष त्यांच्यासोबत राहिले. तेव्हा आम्ही दुसरीकडे जाऊ शकत होतो, सत्ता मिळवू शकलो असतो, पण विचारधारा म्हणून सोबत राहिलो. युतीशी एकनिष्ठ राहिलो, मैत्री जपली. आता सगळे काही मिळाल्यानंतर मित्रालाच संपवायचा विचार ते करत असतील तर आम्ही वेगळा विचार करण्यात गैर ते काय? आमच्या हिंदुत्वावर टीका करताहेत मग 2014 मध्ये आम्ही हिंदू नव्हतो का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
गद्दार पक्षात नको, नव्याना संधी मिळेल
गद्दारी केलेल्या एका आमदारानं तर पोह्यांवर हात ठेवला होता. मी अन्नाची शप्पथ घेऊन सांगतो, असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र तेदेखील गेले. झालं ते चांगलंच झालं, असं मी मानतो. कारण अशी माणसं पक्षात नको. या 40 जागांवर नव्यांना संधी मिळेल. या 40 जणांमुळे तिथल्या अनेक चांगल्या शिवसैनिकांना ‘मातोश्री’पर्यंत पोहोचता येत नव्हतं. आता ते 40 जण स्वतःच बाजूला झाले आहेत. त्यामुळे तिथे नवं नेतृत्त्व तयार होईल, असा विश्वास आदित्य यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे भेटत नाहीत, अशी गद्दार आमदारांची तक्रार होती. कोणावर तरी खापर फोडायचं म्हणून ही टीका होते. वर्षाचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं तरी या टीकेतील फोलपणा लक्षात येईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

























































