
मजबूत रस्ते, चांगले फुटपाथ, स्वच्छ-सुंदर परिसर, हिरव्यागार – मोकळ्या जागा, आकर्षक ‘बेस्ट’ थांबे अशा नागरी कामांमुळे गेल्या तीन वर्षांत वरळीचा ‘ए प्लस’ सर्वांगिण विकास झाला आहे. वरळीचा हेवा वाटणारा विकास विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळेच वरळीचा राजकीयदृष्टय़ा फायदा करून घेण्यासाठी या ठिकाणी पैसा खर्च करण्याचा प्रयत्न होत असून बेकायदेशीर बॅनरबाजी सुरू असल्याचा सणसणीत टोला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज लगावला. वरळीत विकासकामे करण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकत नाही, असे सांगतानाच तुमचे आशीर्वाद आणि प्रेमासाठी काम करीतच राहू असा ठाम विश्वास व्यक्त करणारे भावनिक पत्रही त्यांनी तमाम वरळीकरांना लिहिले आहे.
वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी तीन वर्षांच्या आमदारकीत केलेल्या कामांचा उल्लेखही आपल्या पत्रात केला आहे. विकासकामांबरोबच सामुदायिक स्तरावर आणि वैयक्तिक स्तरावर लसीकरण आणि इतर समस्यांचे निराकरण केले आहे. तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर तीन वर्षांत आपल्या प्रेमाने आणि आशीर्वादामुळेच ही कामे करू शकल्याचे त्यांनी सविनयपणे म्हटले आहे. निवडणुकीपूर्वी ‘वरळी ए प्लस’ बनवण्याचे वचन आपण तुम्हाला दिले होते. तुमचे आशीर्वाद आणि प्रेमामुळे त्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. वरळीला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी आपण सर्व एकसंध होऊन काम करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
वरळीच्या विकासाचा विरोधकांनाही हेवा!
राजकीयदृष्टय़ा महत्त्वपूर्ण विकसित वरळीला आता वेळ आणि पैसा द्यायची प्रत्येक पक्षाची इच्छा होत आहे. वरळीत विरोधकांकडून लागलेले बेकायदेशीर बॅनर आणि त्यावर होणारा खर्च पाहून वरळीचा हेवा वाटणारा विकास होत असून त्यांनाही इथे यावंसं वाटतंय, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.






























































