
‘महाराष्ट्रासाठी मला अटक करणार असाल तर मी नक्कीच बेळगावात जाईल आणि मी लपूनछपून जाणार नाही. हजारो शिवसैनिकांसह कोल्हापूरच्या रस्त्याने जावू आणि बेळगावच्या न्यायालयात स्वत:ला अटक करून घेऊ. त्यांना आम्हाला किती दिवस ठेवायचे ठेऊ द्या’, असा हुंकार शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भरला. बेळगाव न्यायालयाने 2018 मधील एका भाषणाप्रकरणी समन्स बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
‘सीमा बांधवांवर कर्नाटक सरकारने निर्घृण हल्ले केले किंवा कायद्याचे बडगे दाखवून त्यांना तुरुंगात डांबले तर त्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटतील’, यात प्रक्षोभक काय आहे मला कळलं नाही, असे संजय राऊत म्हणाले. 2018 ला केलेल्या भाषणाची दखल घेऊन मला आता त्यांनी कोर्टात हजर रहायला सांगितले आहे. याचा अर्थ असाय की मी तिथे कोर्टात जावं, आणि मग कोर्टात गेल्यावर माझ्यावर हल्ला व्हावा. मग तिथे गेल्यावर मला अटक करावी आणि तिकडल्या तुरुंगात टाकावे अशा प्रकारचे कारस्थान सुरू असल्याचे दोन दिवसांपासून माझ्या कानावर आले आहे, असेही ते म्हणाले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई महाराष्ट्रासंदर्भात केलेले वक्तव्य सुद्धा चार दिवसांपूर्वीचे आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, सांगलीकडचा भाग कर्नाटकात घेण्यासंदर्भात त्यांनी विधान केले. त्यांनी एका विषयाला तोंड फोडले आहे आणि त्याचवेळी जे आमच्यासारखे महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून लढताहेत त्यांना अशा प्रकारे कायदेशीर बाबीत गुंतवून, बेळगावात बोलावून त्यांच्यावरती हल्ले करायचे असे कारस्थान शिजताना दिसतेय. याची दखल खरी तर महाराष्ट्र सरकारने घ्यायला हवी, असेही संजय राऊत म्हणाले.
170 वा हुतात्मा व्हायला तयार!
शिवसेना ही सीमाबांधवांसाठी कटिबद्ध आहे. शिवसेनेने सीमाबांधवांसाठी 169 हुतात्मे दिले आहेत, 170 हा हुतात्मा व्हायला तयार आहे. बाळासाहेब ठाकरेंनी सीमाप्रश्नासाठी तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगला होता. शिवसैनिकांनी तेव्हा तीन दिवस मुंबई पेटवली होती. त्याच्यामुळे ती धग आमच्यात कायम आहे. मला अटकेची भीती नाही, मग ते कर्नाटकचे सरकार असो किंवा अन्य कुठले, असेही राऊत म्हणाले.
View this post on Instagram
आम्ही लढत राहू
महाराष्ट्र सरकारचे जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत किंवा बेळगाव-कारवारसंदर्भात राज्य सरकारने नेमलेले चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे मंत्री असोत त्यांनी या विषयाची दखल घेतली पाहिजे. पक्ष म्हणून नाही तर राजकीय वाद-मतभेद बाजूला ठेऊन याकडे पाहायला हवे. ते महाराष्ट्राची पुन्हा एकदा कोंडी करत आहेत. महाराष्ट्राविषयी, सीमाप्रश्नांबाबत बोलणाऱ्यांना ते अशा प्रकारे अडकवू इच्छितात. पण शिवसेना सीमाबांधवांसाठी वचनबद्ध आहे. त्याच्यामुळे मला अशा प्रकारे वारंट असेल, अटकेची तलवार असेल त्या तलवारीशी आम्ही लढत राहू, असेही राऊत म्हणाले.
पक्षप्रमुखांशी बोलून निर्णय घेणार
1 तारखेला कोर्टात हजर राहणार का? असे विचारले असता या संदर्भात आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी म्हटले. महाराष्ट्र सरकारने हस्तक्षेप करायला हवा, कारण ही सीमाभागाची लढाई आहे. पण अजुनपर्यंत या सगळ्या विषयावर राज्य सरकारने बुळबुळीत भूमिका घेतली आहे. बोम्मई बोलले त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर नाही, प्रतिहल्ला नाही. फडणवीसांनी उत्तर दिले, पण त्याच्यात फारसा दम नाही. त्यामुळेच त्यांनी जे लढणारे लोक आहेत त्यांना वारंट पाठवून अटकेची भीती दाखवत आहेत. पण शिवसेना घाबरणार नाही, शिवसेना डरपोक नाही. पक्षप्रमुखांशी बोलून निर्णय घेईल, असेही राऊत म्हणाले.
























































