
सामना प्रतिनिधी, धुळे
महापालिकेच्या निवडणुकीतील प्रभाग क्रमांक पाचच्या लढतीकडे साऱयांचे लक्ष केंद्रित झाले आहे. शिवसेना उमेदवारांनी रविवारी सकाळी प्रभागातील साईबाबा मंदिर परिसरात प्रचार फेरी काढली. ज्येष्ठ मतदारांचे चरणस्पर्श करीत उमेदवारांनी आशीर्वाद घेतले. तर त्यांच्या प्रचारकांनी घराघरात प्रचार पत्रक पोहोचवून मते मागितली.
शहरातील नकाणे रोड ते वाडीभोकर रोडदरम्यानचा परिसर प्रभाग पाचमध्ये येतो. या प्रभागातून शिवसेनेने कुशल संघटन असलेले उमेदवार दिले आहेत. त्यात माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील, मावळत्या नगरसेविका ज्योत्स्ना पाटील, योगिता पाटील आणि दिगंबर चौधरी शिवसेनेचे उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे हे उमेदवार प्रचारात आघाडीवर आहेत. रविवारी नकाणे रोडलगत असलेल्या साईबाबा मंदिरात उमेदवारांनी आशीर्वाद घेतले. प्रचाराचा नारळ वाढवीत परिसरातून प्रचार फेरीही काढली. ज्येष्ठ नागरिकांचे चरणस्पर्श करीत उमेदवारांनी मते मागितली. पर प्रचार फेरीत सहभागी झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी मतदारांच्या हाती प्रचार पत्रके देत शिवसेना चिन्हा समोरील बटन दाबून मते देण्याचे आवाहन केले.


























































