
मनोज श्रीवास्तव । अयोध्या
अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी शिवसेनेने पुढाकार घेतल्यानंतर देशभरातील हिंदू त्यासाठी एकवटू लागला आहे. हिंदुत्ववादी संघटनाच नव्हे तर अनेक धार्मिक, सामाजिक संघटनांचे कार्यकर्तेही अयोध्येत जमू लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाऊन तेथील नागरिकांशी संवादही साधणार आहेत. त्या कार्यक्रमाला अयोध्येतील संतमहंतांबरोबरच स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांचे कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अयोध्यावासीयांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच अयोध्येला येत आहेत. त्यामुळे त्यांच्या अयोध्या दौऱयाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. 24 नोव्हेंबरला दुपारी विमानाने फैजाबाद हवाईपट्टीवर उतरल्यानंतर तिथे त्यांचे भव्य स्वागत होईल. तेथून लक्ष्मण किला मैदानात आशीर्वाद समारंभ आणि संत पूजनाचा कार्यक्रम होईल. त्यात उद्धव ठाकरे हे मुख्य यजमान असतील. त्यानंतर ते सायंकाळी शरयू आरती करतील. त्या आरतीच्या वेळी शरयू तीरावर हजारो हिंदू भाविक उपस्थित राहणार आहेत.
25 नोव्हेंबरच्या सकाळी उद्धव ठाकरे हे श्रीराम जन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतील. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी संवाद साधतील. पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे यांचा अयोध्यावासीयांशी संवाद होईल. त्या जनसंवाद कार्यक्रमाला हजारो अयोध्यावासी उपस्थित राहणार आहेत. हा राजकीय कार्यक्रम नाही आणि शक्तिप्रदर्शनही नाही असे सांगतानाच हिंदुत्वाच्या हितासाठीच आमची ताकद लावू असे अयोध्या भेटीवर असलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. राममंदिरासाठीच जनतेने आम्हाला बहुमत दिले, त्यामुळे राममंदिरासाठी सरकारवर दबाव आणलाच पाहिजे, असे ते म्हणाले.
काँग्रेसींनाही अयोध्येत हवे मंदिर
राममंदिर निर्मितीसाठी सरकारला अध्यादेश आणावाच लागेल असे सांगतानाच खासदार संजय राऊत यांनी अयोध्येत राममंदिर व्हावे असे काँग्रेस नेत्यांनाही वाटत आहे असे सांगितले. यासंदर्भात काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱयांनी भेटून मंदिर उभारणीसाठी पाठिंबा दर्शवल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने मंदिर निर्मितीसाठी अध्यादेश आणला तर तो 400 पेक्षा जास्त मतांनी मंजूर होईल, असा ठाम विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.






















































