“निधी वाटपातील असमतोल महाराष्ट्राचे राजकारण नासवत आहे”, संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्रिपद स्विकारल्यानंतर नुकतंच निधीचं वाटप केलं. मात्र निधी वाटपात त्यांनी भेदभाव केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. राष्ट्रवादीमधून फुटून त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना त्यांनी भरघोस निधी दिला. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

“स्वतःसोबत आलेल्या आमदारांना निधी वाटप करणे याला लूटमार म्हणतात. माझ्या हातात तिजोरी आहे म्हणून मी लुटायचं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या गोष्टी झाल्या. अजित पवार महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री होते आणि आताच्या सरकारमध्येही अर्थमंत्री आहेत. तेव्हाही याच गोष्टी झाल्या. माझ्या बरोबर 40 आमदार आहेत म्हणजे मी निधी वाटपात त्यांचेच खिसे भरेन. हा निधी वाटपाचा असमतोल आहे. हे महाराष्ट्राचे राजकारण नासवत आहे.” अशी टीका राऊत यांनी केली.

“रवींद्र वायकर या विषयात न्यायालयात गेले आहेत. निधी वाटपाचा हा नवीन प्रकार समोर येत आहे. हा निधी वाटपाचा अपहार आहे. गोगावलेंना दीडशे कोटींचा निधी दिला हे ऐकून मला धक्का बसला. मंत्रिपद दिलं नाही म्हणून शांत करण्यासाठी तुम्ही ही किंमत देत आहात का? निधी वाटप हा महाराष्ट्राच्या राजकारणातील संशोधनाचा विषय आहे.याया” असे राऊत म्हणाले.

“लोकं एका भीती पोटी पक्ष सोडत आहेत. ज्यांनी पक्षांतर केले त्यांचा एक पाय तुरुंगातच होता. मग ते शिवसेनेतील असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील. एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्री होण्याचा 145 चा आकडा नव्हता. मुख्यमंत्री ते स्वतः झाले नाहीत त्यांना कोणीतरी केलं आहे. ज्यांच्याकडे मुख्यमंत्री होण्याचा आकडा आहे ते मुख्यमंत्री होत नाहीत आणि ते दुसऱ्यांवर आकडा लावतात.” असे राऊत म्हणाले.

पंतप्रधानांनी बाहेर जे वक्तव्य केलं तेच वक्तव्य संसदेत करावं

“मणिपूरच्या घटनेमुळे आता मिझोराममधून देखील लोकांचं पलायन सुरु झालं आहे. आता हळू हळू शत्रू राष्ट्रे मणिपूरचा ताबा घेतील त्याची फार मोठी किंमत या देशाला चुकवावी लागेल. संसदेचे अधिवेशन सुरु असून देशभरातील संसदेचे प्रतिनिधी दिल्लीमध्ये आले आहेत. त्यांना मणिपुरवर चर्चा करायची आहे. मणिपुरवर चर्चा करत असताना पंतप्रधानांनी उपस्थित राहावं, अशी मागणी ते करत आहेत. मणिपूरमध्ये हिंसा का भडकली आहे? महिलांची नग्न धिंड का काढली जात आहे? यातील आरोपींना तुम्ही काय शिक्षा ठोठावताय? याविषयी पंतप्रधानांनी बाहेर जे वक्तव्य केलं तेच वक्तव्य आतमध्ये करायचं आहे. मात्र या देशामध्ये लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरु आहे. विरोधी पक्षांचा आवाज दाबला जातोय. सरकार संसद आणि लोकशाहीला मानायला तयार नाही.” असे राऊत म्हणाले.

मणिपूरच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त करणाऱ्या नायायाधीशांवर टीका केली जाते

“मणिपूरच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली आहे. या न्यायाधीशांवरच भाजपचे लोक जाहीरपणे टीका करू लागले आहेत. ही अत्यंत भयावह गोष्ट आहे. विरोधकांची भूमिका ही देशाची भूमिका आहे. आजची आमची चर्चा काय असेल यासाठी आम्ही मल्लिकार्जुन खरगे यांच्या चेंबरमध्ये बैठक घेत आहोत. विरोधकांची एक देशहिताची छोटीशी मागणी पंतप्रधानांकडून जर मान्य होत नसेल तर तुम्ही जगभरात लोकशाहीचा डंका कशाला वाजवता. चर्चेतून प्रश्न सुटतात आणि मार्ग निघतो.” असे राऊत म्हणाले.

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता तर हिंसा थांबली असती

“विरोधकांना पंतप्रधांनांवर वयक्तिक टीका करायची नाही. विरोधकांकडे जी माहिती आहे त्या माहितीचे ते आदानप्रदान करतील. त्यातून पंतप्रधानांना काही निर्णय घेण्याकरिता योग्य दिशा मिळेल. पण त्यांना ऐकायचंच नाही. तुम्ही निवडणूक घेता त्यातून लोकं निवडून येतात ती कशाकरिता? मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा योग्यवेळी राजीनामा घेतला असता तर तिथे हिंसेला योग्यवेळी ब्रेक लागला असता. मात्र तसं घडलं नाही. याउलट मणिपूरची परिस्थिती चिघळत गेली. मणिपूरच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना काय अहवाल दिला आम्हाला माहित नाही. राष्ट्रपती महिला आहेत राज्यपाल महिला आहेत. असे असताना मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढून त्यांची हत्या केली जाते.” असे राऊत म्हणाले.

“महाराष्ट्र हा कष्ट करणाऱ्यांचा आणि सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांतून फिरणारा महाराष्ट्र आहे. एकनाथ शिंदे हे एकेकाळी शिवसैनिक होते. त्यामुळे त्यांना कष्टाचा वारसा आणि बाळकडू आमच्याकडूनच मिळालेलं आहे.” असे राऊत म्हणाले.