शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या! शिवसेनेचा तहसील कार्यालयांवर मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवकाळी पावसामुळे कोकणातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसाने नष्ट केल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यामागणीसाठी शिवसेना सोमवारी सकाळी 11 वाजता रत्नागिरीतील सर्व तहसीलदार कार्यालयांवर मोर्चा काढणार आहे.

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले.भातशेतीच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी कोकणाचा दौरा केला होता.त्यानंतर काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते, माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतला होता.सरकारकडून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळणार असल्याने शिवसेनेने तुटपुंज्या मदतीवर नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांवर 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता शिवसेना मोर्चा काढणार आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी सांगितले की, शासनाने शेतकऱ्यांना भातशेतीच्या नुकसानीची जाहीर केलेली 8 हजार रुपयांची नुकसान भरपाई आम्हाला मान्य नसून भातशेतीची 25 हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्याचबरोबर आंबा आणि काजू बागायतदारांना 18 हजारांच्या नुकसान भरपाई ऐवजी 50 हजारांची नुकसान भरपाई द्या. ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करा. त्याचबरोबर क्यार वादळामुळे मच्छिमारांचे नुकसान झाले आहे. मच्छिमारांना नुकसान भरपाई देऊन त्यांनाही कर्जमाफी द्यावी, अशी मागणी उद्याच्या मोर्चात केली जाणार असे चाळके यांनी सांगितले. शिवसेनेच्या मोर्चात शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.