लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार, मिंधे आणि त्यांचे गट दिसणार नाही; संजय राऊत यांचा विश्वास

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेतली. संगलीतील जागा महाविकास आघाडीच जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीत कोणतेही वाद नाही. राज्यात सर्व 48 जागांवर आम्ही एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून लढत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात अजित पवार आणि मिंधे यांचे पक्ष आणि ते दिसणार नसून भाजप त्यांना गिळून ढेकर देणार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

सांगलीत आमचाच विजय होणार आहे. आम्ही महाविकास आघाडीकडून अर्ज भरला आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. आम्ही एकत्रितपणे निवडणुका लढवत आहोत.विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आहे, तिथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. आमच्या पक्षाच्या, त्यांच्या पक्षाचा उमेदवार असे काही नसून सर्व उमेदवार हे महाविकास आघाडीचेच आहेत.

विशाल पाटील हे समजूत आहे. ते त्यांचे आजोबा वसंतदादा पाटील यांच्यापेक्षा वेगळा विचार करणार नाही, असा विश्वास आहे. ते महाविकास आघाडी परिसवारातील आहेत. त्यांच्याशी आमचा उत्तम संवाद आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाचा वेगळा विचार असतो, भावना असतात. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू. आमच्यात कोणतेही वाद नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

मिलिंद देवरा राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसमधून उडी मारून एका गटात गेले. त्यामुळे तो गट त्यांच्याकडून वदवून घेत आहे. त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. ते ज्या गटात गेले आहे, त्यांचा संविधान संपवण्याचा डाव आहे. त्याचसाठी ते 400 पारचा नारा देत आहेत. त्यामुळे संविधान संपवण्याच्या गटात असलेल्यांनी आम्हाला दलितविरोधी म्हणणे यात काहीही तथ्य नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. आम्हाल संविधान बदलायचे आहे. दलितांचे आरक्षण रद्द करायचे आहे, असे सांगणाऱ्या पक्षात मिलिंद देवरा आहेत.

महायुतीने नाशिकमध्ये कोणताही उमेदवार दिला तरी शिवसेनेच्या उमेदवाराने आघाडी घेतली आहे. नाशिकमधून आपण जिंकू शकत नाही, याची जाणीव झाल्याने त्यांनी उमेदवारी मागे घेतली असावी, असा टोलाही त्यांनी लगावला. आता आमच्याविरोधात कोणीही उमेदवार दिला, तरी त्याला त्याचे डिपॉझिट वाचवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचे पक्ष राज्यात दिसणार नाही. त्यांना गिळून भाजपने ढेकर दिली असेल. प्रकाश आंबेडकर यांना राजकीय भविष्य उत्तम समजते. याबाबत त्यांनी केलेले विधान सत्य असल्याचेही राऊत यांनी सांगितले.भाजप आणि त्यांच्यासोबत असलेल्या गटांमध्ये कोणताही ताळमेळ नाही. त्यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार मिळत नाही. अनेकजण उमेदवारी नाकारत आहेत. त्यामुळे अनेक जागांवर त्यांचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

मी निधी देतो, तुम्ही कचाकचा बटन दाबा, असे अजित पवार यांचे वक्तव्य हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. अशी धमकी आणि दहशवाद पसरवला जात असेल आणि निवडणूक आयोग डोळ्यावर पट्टी बांधून सर्व बघत असेल, तर लोकशाहीचे हे दुर्दैव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात दौरे वाढत आहेत, याबाबत ते म्हणाले की, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असलेली भीती आता स्पष्टपणे दिसत आहे. पराभवाच्या भीतीने त्यांचे पाय लटपटत आहेत, त्यामुळे त्यांचे राज्यातील दौरे वाढत आहेत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.