त्यांना आतापासूनच घाम फुटला…पळापळही सुरू झाली; संजय राऊत यांचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येऊन जनतेचे मनोरंजन करतात. तुम्ही आमच्या राज्यात येता, लोकांचे मनोरंजन करता आणि आमची लोक त्याचा आनंद घेतात. जनतेचा कौल तुम्हाला 2024 च्या निवडणुकीत कळेल. तुम्हाला आतापासूनच घाम फुटला आहे आणि पळापळही सुरू झाल्याचा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मिंधे गटावर केला केला आहे.

सरकार पाडण्यासाठी, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी, आमदार खासदार खरेदी करण्यासाठी जे काही केले त्याचा पूर्ण हिशोब पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी द्यावा, आम्ही पण चर्चेसाठी तयार आहोत. तुम्ही काय केले आणि काय नाही याचा पूर्ण हिशोब आमची लोकंही द्यायला तयार आहेत.

वंचीत बहुजन आघाडीने उमेदवारांनी लेखी वचन द्यावे की ते एनडीएसोबत जाणार नाही यावर संजय राऊत म्हणाले की, आज यावर आम्ही चर्चा करणार आहोत. कोणाला आमच्या वचनबद्धतेबाबत शंका आशंका करण्याची गरज नाही. आम्ही वचन पाळणारी लोकं आहोत. काही लोकं अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करु इच्छित आहेत. जसे उत्तरप्रदेशात मायावती आहेत, काही लोकं आरएसएसचा छुपा अजेंडा घेऊन काम करतात. आम्ही त्यांच्यासोबतही लढणार आहोत. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबडेकर महाविकास आघाडीचे सदस्य, नेते आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबडेकर राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद्रचंद्र पवार) पक्षाचे शरद पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते आम्ही सर्व बसून वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करणार आहोत.

अमित शहा महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रातील जनतेचे मनोरंजन करतात. कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात तर कधी अमित शहा येतात आणि या राज्याच्या जनतेचे मनोरंजन करतात. 370 कलमावेळी मांडीला मांडी लावून बसले, कुठेतरी लाज वाटली पाहिजे या अमित शहांच्या टिकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, लाज तुम्हालाच वाटली पाहिजे. 370 कलम तुम्ही रद्द केलं आणि त्याला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आम्ही तेव्हा भाजपसोबत नव्हतो तरी त्यांना 370 कलमाच्या बाबतीत पाठिंबा दिला होता. त्यामुळे अमित शहां यांनी त्यांची स्मरणशक्ती व्यवस्थित करुन घेतली पाहिजे असा जबरदस्त टोला संजय राऊत यांनी लगावला.

संजय राऊत म्हणाले, 370 कलम रद्द करुन काश्मिरकमध्ये काय दिवे लावले ते आधी सांगा? असा सवाल करत म्हणाले कश्मिरी पंडीत आले का? हजारो कश्मिरी पंडीत आजही आपल्या राज्यात 370 कलम हटवल्यावरही निर्वासिताचे जीवन जगतायतं. त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत जात नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. काश्मिरचे नाव घ्यायची तुमची लायकी नाही. आजही रोज दोन किंवा चार लष्करी जवान आमचे शहीद होत आहेत. 370 कलम हटवून तुम्ही काय केले? लाज तुम्हाला वाटली पाहिजे. सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीत आपण लोकांशी खोटं बोललो. अशाप्रकारचा सर्जिकल स्ट्राईक झाला की नाही याच्यावर शंका आताही निर्माण होत आहेत. आजही कश्मिरचा तरुण बेरोजगार आहे. 370 कलम हटवल्यावर कश्मिरमधील बेरोजगारी ताबडतोब दूर होईल असे बोलला होतात. काय झाले ? आजही कश्मिरमधील तरुण अस्वस्थ आणि अस्थिर आहेत. अखंड हिंदुस्थान करू, पाकव्याप्त काश्मिर हिंदुस्थानामध्ये आणू अशी 2014ला घोषणा केली होती. 2019ला घोषणा केली होती. काय केलं? पुलवामा ज्याप्रर्कारे घडले किंवा निवडणुका जिंकण्यासाठी घड़वले गेले आणि मत मागण्यासाठी जो काही शहिदांचा बाजार मांडलात तर लाज तुम्हाला वाटली पाहिजे असा हल्ला बोल अमित शहांनी केलेल्या वक्तव्यावर केला. उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचे आहे, असे  अमित शहा म्हणाले, टोला लगावला असे म्हणतात. हे कसले टोले. ते काय गल्लीतील क्रिकेट खेळतात का ? आम्ही एकच टोला मारु.

शरद पवार यांनी ज्यांना सहन केले ते अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे ओझे घेऊन ते तुमच्या पक्षात गेले आणि त्यांना तुम्ही स्विकारले ओझं आणि त्यांना तुम्ही सहन करताय त्यासाठी आम्ही अमित शहांचे आभारी आहोत असेही संजय राऊत म्हणाले.

संभाजीनगरमध्य़े गेले अनेक काळ शिवसेनेचा उमेदवार होता या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, शिवसेनेचा होता शिंदे गटाचा नव्हता. छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेना लढत आहे. खरी शिवसेना. आम्ही लढणार आणि जिंकणार. आता जी काही अमित शहांनी निर्माण केलेली टोळी आहे. त्यांच्याकडून ती जागा काढून घेतली असेल त्याच्याशी आमचा काय संबंध? त्याची त्यांना लाज वाटली पाहिजे. जे त्यांच्यासोबत आहेत त्यांना. पण छत्रपती संभाजीनगरची जी जागा आहे ती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना लढणार आणि जिंकणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. मात्र अशा अनेक जागा आहेत ज्या शिवसेनेच्या भाजप घेत आहे यावर संजय राऊत म्हणाले, शिवसेनेच्या नाही शिंदे गटाच्या. शिंदे टोळीच्या घेत आहेत आमच्या नाहीत. आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या जागा आहेत परंपरेने त्या लढतोय आणि त्या आम्ही जिंकू असा निर्धारच यावेळी व्यक्त केला.

सांगलीमध्ये काँग्रेसचा 2014 साली साडेतीन लाख मतांनी पराभव झाला होता . 2019 तिथे काँग्रेसचा उमेदवार नव्हता तिथे काँग्रेस लढली नाही. मात्र कोल्हापूर सातत्याने 30 वर्षे शिवसेना तो मतदार संघ लढतेय. तो कधी जिंकतोय कधी हरतोय. सध्या विद्यमान खासदार आमचा आहे. प्रख्यात अभिनेते रमेश देव हे सुद्धा शिवसेनेकडून कोल्हापूरला लढले आहेत. रमेश देव आमचे उमेदवार होते, असेही ते म्हणाले.

रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती असा आरोप दीपक केसरकर यांनी केला त्यावर संजय राऊत म्हणाले, पीएमओ कार्यालयाला याबाबत खुलासा करायला सांगा. दीपक केसरकर सारख्या लोकांना काही कामधंदा नाही. ते बहकले आहेत. ते भाजप, मोदी,आरएसएसचे गुलाम झाले आहेत. त्यामुळे अशाप्रकारचे बेताल बोलतात. जर ते पंतप्रधानांना भेटले तर त्यांच्या कार्यालयाकडून या तारखेला भेटले असा खुलासा घ्या. आम्ही का भेटणार आम्हाला काय गरज आहे असेही ते म्हणाले. दीपक केसरकर बोलतात त्यांची ताकद कळाली. त्यावर संजय राऊत म्हणाले कोणाची ताकद, दंडावर बेडक्या नाहीत त्याच्या. हा सावंतवाडीच्या मोती तलावातला डोमकावळा. हा डोमकावळा बसला की हडहड करतात. हा डोमकावळा आमची ताकद दाखवतोय की त्याची ताकद दाखलतोय? हिंमत असेल तर सावंतवाडीला निवडुन या असे आव्हान देत उगाच बदकासारखे पकपक करु नका, असेही त्यांनी खडसावले.

महाविकास आघाडीची बैठकीबाबत संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकरांचे पत्र वाचायचे असते. ते उत्तम वक्ते आहेत, उत्तम लेखक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्तम लेखक होते उत्तम पत्रकार होते, उत्तम पत्र लेखक होते आता त्यांचा वारसा प्रकाश आंबेडकर लिखाणातून चालवत असतील तर आपण त्यांचे स्वागत केले पाहिजे. आंबेडकर छान लिहीतात, उत्तम विचार मांडतात ते वाचायची असतात. त्यात आम्हाला संशयास्पद वाटत नाही. आम्ही त्यांच्यावर प्राणाणिकपणे विश्वास ठेवतो. आमचा मायावतींवर विश्वास नाही. मायावती भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करतायत. मायावती आरएसएसचा अजेंडा चालववतायत. मायावतींवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. मायावती दबल्या गेल्या आहेत. पण प्रकाश आंबेडकर तसे नाही. प्रकाश आंबेडकर या महाराष्ट्रातल्या मातीतल्या डॉ. आंबेडकरांचा वारसदार आहेत. ते ठामपणे मोदींची हुकूमशाही गाढण्यासाठी आमच्यासोबत उभे राहतील. भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होणार नाही याची पूर्ण खात्री आहे, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.