उद्धव ठाकरे यांनी केली चार उमेदवारांची घोषणा; सर्वसामान्यांना मोठे करणे हेच आमचे वैशिष्ट्य

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत लोकसभेसाठी बुधवारी चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच उन्मेष पाटील यांनी खरे बंड काय असते, ते दाखवून दिले आहे. आमच्याकडे झाली, ती गद्दारी होती. त्यामुळे खरे बंड काय असते, ते जनतेला समजले आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी उन्मेष पाटील यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावेळी सांगितले. तसेच लोसभेसाठी पक्षाच्या चार उमेदवारांच्या नावाची घेषणाही केली.

‘शिवसेना धक्का देते तो जबरदस्त असतो. आता सत्ताबदल होण्याच्या दृष्टीने हा झालेला बदल महत्त्वाचा आहे. देश हुकूमशाहीच्या दिशेने जात आहे. त्याविरोधात आम्ही लढत आहोत. आता त्यांच्या पक्षातील निष्ठावंतांनाच डावलण्यात येत असल्याने ते आता आमच्याकडे आले आहेत. हे खरे बंड आहे. आमच्या पक्षाशी झाली होती ती गद्दारी होती. त्यामुळे खरे बंड कसे आणि काय असते ते उन्मेष पाटील आणि करन पवार यांनी दाखवून दिले आहे.’

कल्याणमधून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. हातकणंगलेमध्ये सत्यजीत पाटील यांना उमेदवारी, पालघरमध्ये भारती कामडी तर जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता फक्त उत्तर मुंबई ही जागा शिल्लक आहे. त्याबाबत मित्र पक्षांशी चर्चा सुरू आहे. ते ती जागा लढवणार असतील तर ठीक आहे.नाहीतर आमचा उमेदवार आम्ही जाहीर करू, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

‘आता हुकूमशाहीविरोधात लाट आहे. त्यामुळे आम्ही मित्रपक्षांना मुंबईतील दोन जागा लढवण्यासाठी सांगत आहोत. वाटाघातील ठरल्याप्रमाणे आमच्या मुंबईतील चार जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. 2019 मध्ये कोल्हापूरच्या दोन्ही जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. आता कोल्हापूरची जागा आम्ही काँग्रेससाठी सोडली. त्यामुळे सांगली आणि हातकणंगले या जागेवर आम्ही लढावे, असा निर्णय घेण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत सहभागी होत मशाल या चिन्हावर लढण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांनी नकार दिल्याने आमचा उमेदवार आम्ही जाहीर केला आहे, असे त्यांनी सांगितले.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली घटना बदलण्याचा प्रयत्न होत आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत यावे, अशी आमची इच्छा होती. मात्र, यावेळी आमचे जमले नसले तरी भविष्यात जमणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेऊ नये, अशी आमची विनंती आहे. आमच्या दोघांच्या आजोबांनी समाजासाठी एकत्रित काम केले होते. तो ऋणानुबंध आमच्या लक्षात आहे. त्यामुळेच आमच्याकडून प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात आम्ही काहीही बोलणार नाही किंवा त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात येणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.