
पालिकेच्या स्थायी, शिक्षण, सुधार आणि ‘बेस्ट’ अशा चारही वैधानिक समित्यांवर शिवसेनेने दणदणीत विजय मिळवून पालिकेवर भगवा फडकवला असताना आज झालेल्या आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी राजुल पटेल आणि बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षपदी प्रतिमा खोपडे यांचा विजय झाला. या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या उमेदवारांचा दारुण पराभव केला.
आरोग्य समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या राजुल पटेल यांना 16 मते मिळाली, तर भाजपच्या बिंदू त्रिवेदी यांना 11 मते मिळाली. या निवडणुकीत 36 पैकी 28 सदस्यांनी सहभाग घेतला. या निवडणुकीत 3 सदस्य मतदानावेळी तटस्थ राहिले तर 5 सदस्य अनुपस्थित होते. या निवडणुकीत एक मत अवैध ठरले. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार वसंत नकाशे हे 17 मते मिळवून विजयी झाले, तर भाजपच्या उमेदवार प्रियांका मोरे यांना एकही मत मिळाले नाही. एकूण 36 पैकी 17 सदस्यांनी मतदानात भाग घेतला. 5 सदस्य अनुपस्थित होते तर 3 तटस्थ राहिले. 11 सदस्य मतदानावेळी अनुपस्थित राहिले. या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी कामकाज पाहिले.
बाजार समितीवरही शिवसेनेचे वर्चस्व
बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार प्रतिमा खोपडे या 18 मते मिळवून विजयी झाल्या, तर भाजपच्या उमेदवार साक्षी दळवी यांना 11 मते मिळाली. एकूण 36 सदस्यांपैकी 30 सदस्यांनी मतदान केले. निवडणुकीत 3 सदस्य मतदानावेळी तटस्थ राहिले. त्यापैकी 1 मत तटस्थांचे अवैध ठरले. 3 सदस्य अनुपस्थित होते, तर 1 मत अवैध ठरले. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार तुकाराम पाटील हे 18 मते मिळवून विजयी झाले, तर भाजपच्या उमेदवार रजनी केणी यांना 12 मते मिळाली. एकूण 36 सदस्यांपैकी 30 सदस्यांनी मतदान केले. 3 सदस्य अनुपस्थित होते. 2 सदस्य तटस्थ राहिले, तर 1 सदस्य मतदानावेळी अनुपस्थित होते. या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर ऍड. सुहास वाडकर यांनी कामकाज पाहिले.































































