
कॉम्रेड गोंविद पानसरे यांच्या हत्ये प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याची प्रगती सांगण्यापेक्षा तपासात काय प्रगती केलीत हे दाखवा, असे खडेबोल उच्च न्यायालयाने गुरुवारी दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) सुनावले. महत्त्वाचे म्हणजे एटीएसने या प्रकरणाच्या सद्यस्थितीचा सादर केलेला अहवालही न्यायालयाने दाखल करून घेतला नाही.
न्या. अजय गडकरी व न्या. शाम चांडक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. पानसरे हत्या खटल्यात आतापर्यंत 17 साक्षीदारांची साक्ष नोंदवून झाली आहे. दोन आरोपी फरार आहे. त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक सरकारी वकील मानपुंवर देशमुख यांनी खंडपीठाला दिली. आम्हाला खटल्यापेक्षा तपासाची प्रगती जाणून घ्यायची आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. यासाठी मुदत द्यावी, अशी विनंती अॅड. देशमुख यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने ही सुनावणी तीन महिन्यांसाठी तहकूब केली.
20 फेब्रुवारी 2015 रोजी पानसरे यांची कोल्हापूर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याचा तपास सीआयडी करत होती. हा तपास योग्य पद्धतीने होत नसून याचा तपास एटीएसकडे द्यावा, अशी मागणी करणारी याचिका पानसरे यांची सून स्मिता पानसरे यांनी केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने याचा तपास एटीएसकडे सोपवला. या तपासावर न्यायालयाची देखरेख आहे.


























































