ते महतत्त्व ’श्रीदत्त’रूप नटले

श्रीशंकर महाराज हे सहज‘संचारी’ अन् दिशा हेच ज्यांचे वस्त्र अशा ‘दिगंबर’तत्त्वाचे सत्पुरुष होते. श्रीमहाराज जिथे कुठे जात असत तिथे ते त्यांच्या सर्व भक्तांना एकत्र जमवून त्यांच्यायोगे उत्सव साजरा करीत. लोकांना भक्तिमार्गाची ओढ लावण्यासाठीचा हा प्रयत्न असे. अशाच पद्धतीचा एक उत्सव श्रीमहाराजांनी ‘वाशिम’ येथे आयोजित केला. ज्ञानेश्वरी, दासबोध, गुरुचरित्र व एकनाथी भागवत या ग्रंथांचा पारायण सप्ताह करण्याचे निश्चित झाले. वाशिमचे मन्नासिंग ठाकूर हे श्रीमहाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांच्याकडे बरीच जागा असल्याने हा कार्यक्रम त्यांच्या येथे करण्याचे निश्चित झाले. श्रीमहाराजांच्या सूचनेनुसार वाशिम व पंचक्रोशीतील सर्व भाविक उत्सवाकरिता एकत्र आले. ज्ञानेश्वरी, दासबोध, गुरुचरित्र आणि एकनाथी भागवताचे पारायण उत्तम रीतीने संपन्न झाले. महाप्रसादासही बरीच गर्दी झाली.

या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन श्रीमहाराजांचे वाशिम येथील भक्त डॉ. हरी त्र्यंबक खरे यांच्या देखरेखीखाली यशस्वीरीत्या पार पडले. सर्वांचे भोजन तसेच कार्यक्रमाची यथायोग्य सांगता झाल्यावर श्रीमहाराजांनी डॉ. खरे यांच्यासमवेत भोजन घेतले. डॉ. खरे यांनी घेतलेले या उत्सवासाठीचे परिश्रम लक्षात ठेवून श्रीमहाराजांनी त्यांचे कौतुक केले अन् त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. तेव्हा त्याच क्षणी डॉ. खरे समाधीवस्थेत गेले. जवळपास अर्ध्या तासाने समाधी उतरल्यावर जागृतावस्थेत आलेल्या डॉ. खरे यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते. कारण श्रीमहाराजांनी त्यांना साक्षात श्रीदत्तात्रेयांचे दर्शन घडविले होते.

नगर येथील एक निस्सीम भक्त श्रीमहाराजांची मनोभावे भक्ती करीत असे. त्याची श्रीमहाराजांवर अपार श्रद्धा होती. श्रीदत्तात्रेय हे त्याचे आराध्य दैवत होते. एकदा अल्पशा आजाराने तो भक्त मरण पावला. नातेवाईक अंत्यसंस्कारांच्या हेतूने पुढील कार्याची सिद्धता करू लागले. त्याचवेळी त्या मृत भक्ताच्या घरासमोर असलेल्या न्हाव्याच्या दुकानात श्रीमहाराजांची दाढी करून घेण्याच्या निमित्ताने एक भक्त त्यांना तिथे आणता झाला. श्रीमहाराजांची अर्धी दाढी करून झाली आणि त्याच वेळी समोरच्या घरात त्या मृत भक्ताचे प्रेत तिरडीवर ठेवण्यासाठी आणले. इथे श्रीमहाराज होते त्याच अवस्थेत तातडीने उठले अन् त्या मृत भक्ताच्या प्रेतावर जाऊन बसले आणि म्हणाले, ‘‘कोठे जातोस? अजून तुला परमार्थ साधावयाचा आहे.’’ एवढे बोलून श्रीमहाराज पुन्हा तिथून निघून न्हाव्याच्या दुकानात आले. अवघ्या काही क्षणांतच श्रीमहाराजांचा तो मृत भक्त एकाएकी ‘‘दत्त! दत्त!’’ असे म्हणत उठून बसला. हे दृश्य पाहून सर्वचजण अचंबित झाले.

श्रीमहाराज काही निवडक भक्तांसमवेत श्रीक्षेत्र गाणगापूर येथे गेले असता तेथील पुजाऱयांनी श्रीमहाराज ब्राह्मणेतर असावेत या उद्देशाने त्यांच्याशी आगळीक केली व दुर्वर्तन केले. हे पाहून श्रीमहाराज तेथून शांतपणे निघाले अन् रुद्रघाटावर जाऊन बसले. त्यावेळी गाभाऱ्यात श्रीदत्तगुरूंच्या निर्गुण पादुकांची षोडशोपचारे पूजा करणे चालू होते. पुजारी नित्यनेमाने पूजा करीत होते. मात्र त्यांचे पूजोपचार रुद्रघाटावर बसलेल्या श्रीमहाराजांच्या मस्तकावर अर्पण होत होते. इथे निर्गुण पादुकांना स्नान घातले की, घाटावर श्रीमहाराजांना स्नान घडत असे. पादुकांवर पंचामृत घातले गेले की, श्रीमहाराजांच्या मस्तकावर पंचामृत पडत असे. हा प्रकार मंदिरातील पुजाऱयांच्या तेव्हा लक्षात आला जेव्हा त्यांनी निर्गुण पादुकांवर वाहिलेली फुले एकाएकी अंतर्धान पावून दिसेनाशी झाली आणि हे वारंवार घडू लागले.

हे दृश्य पाहून घाटावर असलेली पुजारी मंडळीही चकीत झाली. त्यांनी घडलेला समग्र प्रकार मंदिरातील पुजाऱयांना सांगितला. सर्व पुजारी घाटावर गेले तेव्हा आपण ज्याला हाकलून दिले त्याच माणसासोबत हे घडत असल्याचे पाहून पुजारी ओशाळले व श्रीमहाराजांना शरण गेले. श्रीमहाराजांनी त्यांना अभय दिले. वास्तविक मंदिरातील निर्गुण पादुकांचे दर्शन घेण्यास गेलेल्या कुणासही पादुकांचे स्पर्शदर्शन होत नाही, परंतु अण्णा थोरात या निस्सीम भक्तास त्यावेळी श्रीमहाराजांच्या कृपेने निर्गुण पादुकांचे स्पर्शदर्शन घडण्याचे भाग्य लाभले.

आपली प्रतिक्रिया द्या