।।श्रीमंत योगी।।

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसावरी जोशी, [email protected]

आज आपल्या शिवरायांचा तिथीनुसार वाढदिवस. साऱ्या जगासाठी आदर्शवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासारख्या सामान्यांच्या मनास अत्यंत जवळचे शिवराय आहेत. आपल्या शिवरायांच्या खुपशा माहीत नसलेल्या गोष्टी, किस्से आपले रोजचे जगणे सुंदर करतात. जगण्याच्या संघर्षाला बळ देतात, उभारी देतात.

छत्रपती शिवाजी महाराज. आज साडेतीनशे-चारशे वर्षांनंतरही या तीन शब्दांची विलक्षण मोहिनी संपूर्ण जगावर गारुड करून आहे. हे तीन शब्द सह्याद्रीच्या-महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवीत आहेत. हे तीन शब्द सूर्यापेक्षाही तेजाने झळाळत राहतील… नेहमीच!

शिवछत्रपती… म्हणजे साऱ्या जगासाठी आदर्श राजे… त्यांचे युद्धतंत्र… त्यांचा गनिमी कावा… त्यांचे अचूक नियोजन… रयतेची काळजी… शत्रूलाही दिलदारपणे वागविण्याची पद्धत… चारही शाह्यांच्या सरदारांनी, इंग्रजांनी, अनेक परदेशी चित्रकारांनी, राज्यकर्त्यांनी जगाच्या इतिहासात राजांवर अखंड स्तुतीसुमनेच वाहिली आहेत.

याहीपलीकडे शिवाजी महाराजांचे अत्यंत मनोहारी रूप तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य माणसांनी… महाराष्ट्रातील अस्सल मराठी मनाने… सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांनी मनात खोलवर साठवून ठेवले आहे आणि दिवसागणिक ते अधिकाधिक गडद… ठसठशीत होत आहे.

तुमचे माझे शिवराय… या भूतलावरील एकमेव आदर्श पुरुष… महाराष्ट्राच्या तांबड्या-काळ्या मातीचे सदोदित जागृत दैवत. या दैवताने महाराष्ट्र धर्म जागता ठेवला… प्रत्येक मराठी मनातील जाज्वल्य, देशप्रेमाचा, आत्यंतिक स्वाभिमानाचा, निखळ, निर्मळ संस्कारांचा, शिस्तीचा, कर्मयोगाचा… अखंड मेहनतीचा… अक्षय्य प्रयत्नांचा… सद्गुणांचा… सद्भावनांचा… सद्विचारांचा… आंतरवन्ही अखंड तेवता ठेवला. या प्रत्येक गुणाचे, भावनेचे सगुण-साकार रूप म्हणजे आपले शिवराय… आजवर कोणीही देवास पाहिले नाही, पण महाराष्ट्राने, सह्याद्रीने, मराठी माणसाने, देव पाहिलाय… त्याच्यातले देवत्वही अनुभवले आहे… शिवरायांच्या रूपात. खरे पाहता राजांना देवत्व देणे मला कधीही पटले नाही, पण जर देव सगुण साकार प्रगटला तर तो शिवरायांसारखाच असेल.

शिवराय कधीही इतिहास होऊ शकत नाहीत, कारण ते आपल्या मनाच्या इतक्या जवळ आहेत की आपल्या रोजच्या जगण्याच्या संघर्षात ते आपल्याला पावलोपावली बळ देतात… सोबत करतात… मनाची उभारी वाढवतात… लढण्याचे सामर्थ्य देतात… विचारांना योग्य दिशा देतात… अगदी कोणत्याही संघर्षात शिवरायांचा गनिमी कावा खूप काही शिकवून जातो. आपल्या इतिहासाची पाने जरा लक्षपूर्वक, बारकाईने पाहिली, विचारपूर्वक वाचली की राजांची प्रकाशात न आलेली अनेक रुपे सापडतात आणि ही त्यांची रुपं आपल्याला खऱ्या अर्थाने जगणं शिकवतात… लढणं शिकवतात.

  • महाराजांच्या जेवणाच्या आवडीनिवडी अतिशय साध्या होत्या. मुगाची खिचडी, ताक-दही, भाजी-भाकरी हा त्यांचा आहार असे. सण-सोहळ्याला जिजाऊंच्या हातची मधभरली पुरणपोळी. रायगडावर सामीष आहाराला थारा नव्हता.
  • व्हिएतनाम, दक्षिण-पूर्वेकडील एक छोटासा देश. वर्षानुवर्षे अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्या महाबलाढ्य अमेरिकेशी लढत राहिला आणि महाराजांच्या प्रेरणेने जिंकलासुद्धा. व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे, छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही जगावर राज्य केले असते.
  • महाराजांनी नियोजन आणि अत्यंत शिस्त याखेरीज कोणतीही गोष्ट केली नाही. शाहिस्तेखानावर आक्रमण करण्यासाठी सोबत केवळ 50 मावळे होते.
  • अनेक लोककलावंतांनी स्वराज्यासाठी आपल्या कलेसोबत समशेरीही हाती धरल्या, परजल्या. पळीपंचपात्रींनी तलवारीचा खणखणाटही अनुभवला. या विलक्षण ऐक्यास आणि समतेस काय म्हणावे.
  • ज्या देशात, प्रदेशात जायचे तेथील बारिकसारिक गोष्टींचा अभ्यास, जनजीवनाचा अभ्यास महाराजांचा असायचा. त्या कामी बहिर्जी नाईक, सुंदरजी प्रभूजी अशा सामान्य माणसांना हाताशी धरून सक्षमपणे हेर खाते तयार केले.
  • शिवरायांसारखे बलाढ्य आरमार उभारणे कोणालाच जमले नाही. अगदी औरंगजेबालासुद्धा. मुस्लिम राजवटींनी सिद्दी, डच, पोर्तुगिज, हबशी यांच्या समुद्री सत्ता निमूटपणे मान्य केल्या. पण या परकीय अतिक्रमणांना पुरून उरले फक्त महाराज. त्यांनी अनेक जलदुर्गाची निर्मिती करून या सागरी अतिक्रमणांना कायमचा वचक बसवला. आपल्या हिंदुस्थानी नौदलाचे जनक छत्रपती शिवराय.
  • माणसाची उत्तम पारख हा महाराजांचा सर्वात मोठा गुण. बोरू आणि समशेर या दोन्ही शस्त्रांना त्यांनी समान महत्त्व दिले. यातून अठरा पगड माणसे महाराजांच्या भगव्याखाली एकवटली.
  • महाराजांचे अर्थकारण अत्यंत चोख आणि समृद्ध होते. स्वराज्यात नेहमीच सुबत्ता नांदत होती. अगदी दुष्काळ पडला तरी रयतेच्या गाडग्या-मडक्यात धान्य भरलेले असायचे. यामागे शिवरायांची काटकसर आणि चोख आर्थिक व्यवहार होते. महाराज आग्र्याहून सुटून आले. त्या आनंदात गडावरील किल्लेदारांनी तोफा डागल्या, जल्लोष केला, पण त्यांच्या या कृतीला महाराजांनी नापसंती दर्शविली. पन्हाळगडाच्या वेढ्याच्या वेळेस गडावरील तेल पुरावे म्हणून आवश्यक तेवढीच दिवाबत्ती केली जात असे.
  • कौटिल्याच्या सूत्राचा वापर महाराजांनी आपल्या युद्धनीतीत केला आहे. राजांचा देवांशी असलेला अलौकिक संपर्क, मंत्रयुद्ध, ईश्वरी साहाय्य या साऱ्या गोष्टी महाराजांनी आपल्या लढायांत वापरल्या आहेत आणि मोठमोठ्या शत्रूंचे मनोबल खच्ची केले आहे.
  • महाराजांची राहणी राजस, ऐश्वर्यसंपन्न, पण तितकीच साधी होती. काटकसर हे त्यांचे महत्त्वाचे धोरण. त्यामुळे स्वराज्यात कधी कोणत्याही गोष्टीची कमतरता पडली नाही. दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस कुतुबशहा जातीने महाराजांच्या स्वागतास आला. त्यांच्या आगत स्वागतासाठी अगदी बहार केली, पण राजांनी या साऱ्या छानछोकीस नम्रपणे नकार दिला आणि त्याला सांगितले की, आम्हाला एवढ्या डामडौलाची सवय नाही आणि आवडही नाही.
  • अजस्त्र, बेलाग सह्याद्री महाराजांचा मित्र. गडकोट, जलव्यवस्थापन, वृक्षसंवर्धन या साऱ्या गोष्टी महाराजांनी पर्यावरणासाठी केल्या. याच पर्यावरणाने त्यांच्या प्रत्येक गनिमीकाव्यात त्यांना साथ दिली. सिंधुदुर्गाचे बांधकाम पाहिल्यावर महाराज किती उच्च दर्जाचे पर्यावरण तज्ञ होते हे लक्षात येते. चहुकडे खारे पाणी असूनही गडावर तीन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. विजयदुर्गाजवळची समुद्रातील खोलवर बांधलेली तटबंदी साऱ्यांनाच ठाऊक आहे.
  • गनिमी कावा हे युद्धतंत्र म्हणजे महाराजांनी आपल्या लष्करास दिलेली मोठी देणगी आहे. शत्रू बेसावध असताना आकस्मात हल्ला हे  गनिमीकाव्याचे तंत्र आता परवा झालेल्या एअर स्ट्राईकमध्ये आपल्याला दिसते.
  • सिंधुदुर्ग किल्ल्याव्यतिरिक्त देशात शिवरायांची दोन मंदिरे आहेत. एक नाशिक आणि दुसरे आंध्र प्रदेशच्या श्रीशैलम येथे महाराजांचे मंदिर आहे. या मंदिरात महाराजांचे जीवनचरित्र भिंतीवर रेखाटण्यात आले आहे.
  • महाराजांनी आपल्या दोन शत्रूंना केवळ पत्रव्यवहाराने संपवले. एक मिर्झाराजे जयसिंग आणि सिद्दी जोहर. जयसिंगाच्या बाबतीत औरंगजेबास पत्र लिहून व सिद्दी जौहरच्या बाबतीत आदिलशहाला पत्र लिहून त्यांनी गनिमीकावा खेळला.
  • शिवरायांनी राजधानी रायगडावर लिहिता मंडप अर्थात छपाईचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. मराठी भाषेत छपाई करण्यासाठी 1670 मध्ये महाराजांनी हा लिहिता मंडप भीमजी पारेख या सुरतेतील व्यापाऱ्याकडून घेतल्याचे एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नोंदीमुळे समोर आले आहे.
  • शिवरायांचे मावळे आणि घोडे अत्यंत चपळ होते. त्यांच्या लष्कराच्या हालचाली चापल्य आणि वेग यांवर आधारलेल्या होत्या. गूळ आणि चणे हा मावळ्यांचा युद्धाच्यावेळी खुराक असायचा. घोड्यांनाही तोच खुराक द्यायचे. आपल्या घोड्यांवर महाराजांचे निरतिशय प्रेम होते. महाराजांचा हा चपळपणा त्यांच्या आरमारातही दिसतो. सिद्दी, पोर्तुगिजांच्या मोठमोठ्या जहाजांना आपल्या छोट्या, चपळ नावांनी गुंगारा दिला.