
रणजीपासून दुलीप ट्रॉफीपर्यंतच्या संघर्षमय प्रवासाला आज श्रेयस गोपालने दिमाखदार शंभरावी सलामी दिली. दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मैदानात उतरताच कर्नाटकच्या या अनुभवी अष्टपैलूने 100 प्रथम श्रेणी सामन्यांचा टप्पा गाठला. 2013 मध्ये सुरू झालेला प्रवास तब्बल 13 वर्षांनी या ऐतिहासिक मुक्कामावर पोहोचला. यश, अपयश, चढ-उतार आणि कठीण परिस्थितींना तोंड देत गोपालने हा पल्ला गाठला. 2013-14 मध्ये रणजी विजेत्या कर्नाटक संघाचा तो भाग होता आणि त्या मोसमात त्याने 22 विकेट घेतल्या होत्या.
केरळकडून खेळल्यानंतर पुन्हा कर्नाटकात परतत त्याने विजय हजारे करंडक विजेत्या संघातही योगदान दिले. या टप्प्यावर पोहोचल्यानंतर गोपालने शंभर सामने खेळणे अविश्वसनीय असल्याची भावना व्यक्त करत या यशाचे श्रेय कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांना दिले. या प्रदीर्घ कारकीर्दीतून शिस्त आणि चिकाटी हीच सर्वात मोठी शिकवण मिळाल्याचे त्याने सांगितले.


























































