![brain rot](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/12/brain-rot-696x447.jpg)
>> शुभांगी बागडे
सामाजिक बदल किंवा ट्रेंड म्हणून जास्त वापरला जाणारा, लोकप्रिय शब्द म्हणून जर ‘ब्रेन रॉट’ या शब्दाची निवड होत असेल तर याचा अर्थ आपण एका घातक वळणावर उभे आहोत.
ईन्स्टाग्रामवरील रील्स किंवा यूटय़ूबवरील शॉर्ट्स, वेगवेगळे मीम्स पाहत बसणं हा अनेकांचा छंद नव्हे व्यसनच. हे डिजिटल व्यसन आपल्या माहितीत नेमकी कोणती गुणवत्तापूर्ण भर घालत असेल, असा प्रश्न रील्स पाहिल्यानंतर आपल्याला पडतो का? तर नाही. मग आपण नेमकं काय पाहिलं हे तरी आठवतं का… तर तेही नाही. पण हे करताना आपले डोळे, आपला मेंदू मात्र सर्वतोपरी कार्यक्षम राहात त्यांची ऊर्जा निरुपयोगी गोष्टींसाठी वापरली जाते. सोशल मीडियावर रिल्स, व्हिडीओ न पाहणारी माणसं आता अस्तित्वातच नसावीत. यात विनाकारण वेळ जात मेंदूवर सोशल मीडियाचा अंमल वाढत राहतो. असं का होतं आणि का घडलं याचं उत्तर आपल्यापाशी नसतं… यालाच ब्रेन रॉट असं म्हटलं जातं.
इंग्रजीतील ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये दरवर्षी त्या वर्षभरात सर्वात जास्त वापरला गेलेला आणि महत्त्वाचा ठरलेला शब्द जाहीर केला जातो. या वर्षीचा हा शब्द आहे ब्रेन रॉट. ब्रेन रॉटचा शब्दश अर्थ मेंदूला गंज चढणे, मेंदू सडणे असा आहे. हे अर्थच आपल्याला मुळापासून हादरवणारे आहेत. यामुळे मेंदूचे कार्य शिथिल होण्याची किंवा विचार करण्याची क्षमता कमी होणे हे जास्त घडत आहे. अधिकाधिक वेळ ऑनलाईन राहिल्यामुळं आणि त्यातही प्रामुख्यानं सोशल मीडियावर बराच वेळ वाया घालवल्यामुळं, अनावश्यक गोष्टी पाहिल्यामुळं त्याचा थेट परिणाम मेंदू आणि आकलन क्षमतेवर होतो. अनेकदा हा परिणाम इतका नकारात्मक असतो की, विचार करण्याची क्षमता आणि वेग मंदावतो. सोशल मीडियावर सतत काही वेळ क्रोल केल्याने मेंदूचं होणारं नुकसान याचाच अर्थ मेंदू सडत जाणे हेच या शब्दात सामावलेले आहे. मेंदूवर ताबा घेणाऱया या निष्फळ प्रक्रिया ‘ब्रेन रॉट’ या संकल्पनेत सामावलेल्या आहेत. असा शब्द सातत्याने वापरला जात असताना त्यातलं गांभीर्य न कळण्याइतपत परिस्थिती असावी हीदेखील एक हतबलता आहे.
अनावश्यक माहितीचा मेंदूवर सातत्याने होणारा आघात मेंदूला अकार्यक्षमतेकडे नेणाराच. स्मार्ट फोनच्या अतिवापराने मेंदू अकार्यक्षमतेकडे जाणं ही एक निरंतर घडत जाणारी क्रिया आहे. स्मार्टफोनवर तासन्तास रिल्स, व्हिडीओ बघत बसणं हे आपल्या दैनंदिन सवयींपैकी एक झालं आहे. फेसबुक झालं की इन्स्टा, मग यू टय़ूब. ते झालं की पुन्हा दुसरं अॅप. हे करत प्राधान्याने करावयाच्या गोष्टी कुठेतरी मागेच राहून जातात. मनाला विरंगुळा देण्यासाठी सुरुवातीला जडलेली ही सवय व्यसनाप्रमाणे पिच्छा पुरवू लागते. यातून सध्या तरी कोणताच वयोगट सुटलेला नाही. लहान मुलांबाबत म्हणायचं तर स्क्रीनवर हलणारी दृश्यं इतकंच त्या बाळबोध मनाला आणि मेंदूला माहीत असते; परंतु मोठय़ांना तर निश्चितच कळत असते. खरंतर सध्या लहानांपेक्षा मोठय़ांचं जग ब्रेन रॉटमुळे जास्त विखुरण्याच्या, उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. लहान मुलांकडून स्मार्टफोनचा होत असलेला अतिवापर याकडे अनेकदा समस्या म्हणून पाहिले जाते; परंतु मोठय़ांकडून होत असलेला अनावश्यक वापर तितकाच चिंताजनक आहे.
अनलिमिटेड डाटा आणि हाताशी असलेला, नसलेला संपूर्ण वेळ स्मार्टफोनचा अंमल या दोन गोष्टी ब्रेन रॉटसाठी सुकाळ ठरलेल्या आहेत. सोशल मीडियावरील निरुपयोगी ऑनलाइन साहित्य पाहण्याची जडलेली सवय थांबवणं आपल्याच हाती आहे. यासाठी काही नियम व निर्बंध याची सवय करून घ्यायला हवी. दिवसभराच्या कामाचे नियोजन करताना वेळ हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. दिवसाची सुरूवात आणि शेवट मोबाईलच्या स्क्रीनवर बोटं फिरवत होत असेल तर आपला वेळ आपण कशासाठी देत आहोत हे लक्षात यायला हवे. बदललेल्या जीवनशैलासोबत अधिकच्या ताणतणावांची देणही आपल्याला लाभली आहे. त्यातून काही अंशी सुटका व्हावी, विरंगुळा मिळावा म्हणून हाताशी स्मार्टफोन आणि त्यातून अनावश्यक कंटेटचा भडिमार हे चक्र सुरूच आहे. ब्रेन रॉट या शब्दाची लोकप्रियता आपल्याला ‘जीवनातील वेळेचे महत्त्व दर्शवते’ असं मानसशास्त्रज्ञ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक अँड्रय़ू प्रझिबिल्स्की म्हणतात. वेळेचे हेच महत्त्व जाणत आपण मन आणि मेंदूच्या निरोगी आयुष्यासाठी पुढे पाऊल टाकले पाहिजे. आपल्या मानसिक, बौद्धिक स्थितीतील बदलांचे संकेत आपल्याला मिळत असतातच. ते ओळखता आले पाहिजेत. अन्यथा ब्रेन रॉट आणि सोबत अनेकविध मानसिक गुंतागुंत, ताण यांनी वेढलेला समाज हीच आपली माणूस म्हणून ओळख ठरेल.
सोशल मीडियापासून दूर जाणं अवघड नाही. यासाठी सर्वप्रथम स्क्रीन टाइमची मर्यादा घालून घ्यावी. मोबाईल हातात घेतल्यानंतर आपण काय बघत आहोत, का बघत आहोत याचे भान असू द्यावे, छंद, पुस्तकं, संगीत ही माध्यमं आपलं जग अधिक सुखकर करतात. आपला वेळ अधिक गुणवत्तापूर्ण गोष्टींसाठी कसा जाईल यावर भर द्यावा. या गोष्टी मन आणि मेंदू दोघांनाही कार्यक्षम आणि प्रसन्न ठेवतात.
सामाजिक बदल किंवा ट्रेंड म्हणून जास्त वापरला जाणारा, लोकप्रिय शब्द म्हणून जर ‘ब्रेन रॉट’ या शब्दाची निवड होत असेल तर याचा अर्थ आपण एका घातक वळणावर उभे आहोत. धोक्याचे असे संकेत समाजभान जपणाऱ्या प्रत्येकाला त्या त्या काळात मिळत राहिले आहेत. त्या त्या समाजाने ते ओळखलेही आहेत. जगप्रसिद्ध साहित्यिक, अमेरिकन निसर्गवादी लेखक हेन्री डेव्हिड थोरो यांनी त्यांच्या ‘वॉल्डन’ या प्रसिद्ध पुस्तकात ब्रेन रॉट या शब्दाचा वापर केला होता. थोरो हे केवळ साहित्यिक नसून एक तत्त्वज्ञ म्हणूनही मानले जातात. जगण्यातली फिलॉसॉफी त्यांनी त्यांच्या साहित्यातून मांडली. ज्या काळात त्यांनी हा शब्द वापरला ते जग इंटरनेटपासून फार दूर असणारं. थोरो यांनी समाजातील अशा काही घडामोडींवर टीका केली होती, ज्याचा अतिविचार, अतिवापर माणसाला मानसिक आणि बौद्धिक अधोगतीकडे घेऊन जातो. आताही तेच होत आहे. अधोगतीकडे नेणारे हे वळण थांबवणं आपल्याच हाती आहे.