सिद्धार्थ कश्यप – संगीताचे घराणे नसलेला संगीतकार, फिफा वर्ल्डकपच्या जागतिक मंचावर केलं सादरीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कतारमधील फिफा विश्वचषकाच्या जागतिक मंचावर लुसेल स्टेडियमवर आयोजित संगीतकारांच्या मेळाव्यात रतलामचा प्रसिद्ध तरुण संगीतकार सिद्धार्थ कश्यप याने आपल्या बँडसोबत सादरीकरण केले होते. आता टेनिस प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाला बुधवार पासून पुण्यातील बालेवाडी मैदानावर सुरुवात झाली. या लीगचे अंथम सॉंग सिद्धार्थ कश्यप याने रचले आहे. यावेळी त्याने आतापर्यंत केलेल्या सांगितीक प्रवासाविषयी माहिती दिली.

फिफा विश्वचषकामध्ये जगभरातील प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. याविषयी संगीतकार सिद्धार्थ कश्यप याने सांगितले की, या कार्यक्रमासाठी मी फारच उत्सुक आहे. विश्वचषकाच्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे सादरीकरण करण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. विशेष म्हणजे इन्स्ट्रमेंटल शो बघण्यासाठी रसिकांनी उत्साहाने दाद दिली, ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. सभागृह आणि स्टेडियम कार्यक्रम करणं यामध्ये बराच फरक आहे. सभागृहातील प्रेक्षकांशी सहज संवाद साधता येतो, मात्र स्टेडियममधील रसिकांना आपल्या कलेसोबत जोडून घेणं हे कलाकारासाठी आव्हानात्मक असतं.

तो त्याच्या रतलामहून मुंबई आणि मुंबई ते कतारपर्यंत केलेल्या प्रवासाविषयी म्हणाला की, आमच्या घराण्यात मी पहिलाच संगीतकार आहे. रतलामनंतर पुढील शिक्षणासाठी पुण्याला गेलो. तिथे केमिकल इंजिनियरिंग, पुणे भारतीय विद्यापीठातून केलं आहे. त्यानंतर मुंबईत स्थायिक झालो. ‘इन्स्ट्रमेंटल फ्युजन’ ही माझी फार जुनी संकल्पना आहे. जागतिक स्तरावर ही कला सादर करताना आम्हाला फारच चांगला प्रतिसाद मिळाला. हिंदुस्थानी संगीत जगभरातील रसिकांपर्यंत नव्या पद्धतीने सादर करणं, हेच आमचं ध्येय आहे. फिफा विश्वचषक कार्यक्रमात आमची निवड होण्याकरिता आम्ही मुंबईत केलेल्या कार्यक्रमाच्या काही व्हिडियो क्लिप्स पाठवल्या होत्या. आमची ‘व्हिज्युअल ट्रिट’ ही संकल्पना येथे खूपच आवडली आणि आमची या जागतिक मंचावर निवड झाल्याचे तो म्हणाला.

सिद्धार्थ त्याच्या यापुढील प्रोजेक्टविषयी सांगतो की, 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही एक गाणं तयार केलं आहे. ते मोहित चव्हाणने गायलं आहे. जानेवारी महिन्यात हे गाणं प्रदर्शित होईल. यापुढील गाण्याबाबत मिका सिंगसोबतही आमची बोलणी सुरू आहेत.