
कल्याणच्या सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड कार्डियाक सेंटरमध्ये करण्यात आलेल्या यशस्वी उपचारामुळे अंथरुणाला खिळलेली महिला चालू लागली आहे. ही महिला गुइलेन-बॅरे सिंड्रोमने (जीबीएस) पीडित होती. पाय आणि खांद्यामधील स्नायू कमकुवत होणे, स्नायुंमधील बळ कमी होणे आणि हात पाय सुन्न पडणे किंवा मुंग्या येणे यासारख्या लक्षणे असलेल्या रुग्णावर आयव्ही इम्युनोग्लोबुलिन आणि फिजिओथेरपीद्वारे यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. डॉ. नीलेश उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकाने किलेल्या उपचारामुळे या 60 वर्षीय महिलेला नवे आयुष्य मिळाले आहे.
उत्तर प्रदेश मधील अलाहाबाद येथे राहणाऱ्या 60 वर्षीय राजकुमारी मिश्रा यांना स्नायुंच्या कमकुवतपणामुळे दैनंदिन कामांमध्ये अडथळा येऊ लागला. हा अशक्तपणा पायापासून सुरू होऊन मांड्यांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर त्यांच्या हातातही अशक्तपणा आला आणि कंगवा, कप, ग्लास धरण्यासही अडचणी येऊ लागल्या. खांद्याच्या हालचालींवरही हळूहळू मर्यादा येऊ लागली व अवघ्या 5 दिवसांतच त्या पूर्णपणे अंथरुणाला खिळल्या.
स्थानिक रुग्णालयात एमआरआय स्कॅन आणि इतर चाचण्या करण्यात आल्या आणि दिवसेंदिवस त्यांची प्रकृती आणखी खालावली. अखेर कुटुंबीयांनी पुढील उपचारांसाठी डॉ. नीलेश उपाध्याय यांच्याशी संपर्क साधला. राजकुमारी यांना एअर अॅम्ब्युलन्सने कल्याणच्या सिद्धिविनायक रुग्णालयात हलवण्यात आले.
आपत्कालीन परिस्थितीत दाखल झालेली ही महिला रुग्ण पूर्णपणे अंथरुला खिळलेली होती. त्यांचे दोन्ही हात आणि पाय हलचाल करु शकत नव्हते. त्यांचा वैद्यकिय इतिहास पाहता तसेच त्यानुषंगाने काही तपासण्या केल्यावर रुग्णाला तीव्र फ्लॅसिड अर्धांगवायूचे तात्पुरते निदान झाले. ज्यामुळे रुग्णाच्या शरीरात कमकुवतपणा आला होता, अशी माहिती डॉ. नीलेश उपाध्याय यांनी दिली. सहाय्यक उपचार आणि फिजिओथेरपीमुळे रुग्णामध्ये सुधारणा दिसून आली आणि 13 व्या दिवशी उभ्या राहण्यास तर 16 व्या दिवशी चालण्यास सक्षम झाल्या आहेत. आता त्या कोणत्याही आधाराशिवाय चालू शकतात, असेही डॉक्टरांनी सांगितले.




























































