सायलंट हीरोज चॅम्पियन; महाराष्ट्राच्या हर्षल जाधवची चमक

379

ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन ऑफ द डेफ, नवी दिल्ली यांच्या मान्यतेने व पंजाब क्रिकेट असोसिएशन ऑफ द डेफ, पंजाब यांच्या सहकार्याने चंदिगड, पंजाब येथे डेफ इंडियन प्रीमियर लीग (डीआयपीएल) ट्वेण्टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र डेफ क्रिकेट संघाचे हर्षल जाधव, विराज कोलते, रतनदीप धानू, विनय सानप, सुदीश नाबर व हेमंत रणदिवे हे खेळाडू सहभागी झाले होते. सदर डीआयपीएल स्पर्धेमध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले होते. हर्षल जाधवने आपली अष्टपैलू चमक दाखवत ही स्पर्धा गाजवली. अंतिम सामना सायलंट हीरोज विरुद्ध बियास इलेव्हन या संघांमध्ये संपन्न झाला. सायलंट हीरोज संघाने प्रथम फलंदाजी करून 2 बाद 203 इतकी मोठी धावसंख्या रचली. मोठय़ा धावसंख्येचा पाठलाग करताना बियास इलेव्हनचा डाव 100 पेक्षा कमी धावसंख्येवर गडगडला.

हर्षल जाधव याचा सहकारी महाराष्ट्राच्याच विजय कोलते याने चार सामन्यांत 203 धावा करून 5 विकेटस् मिळविल्या. तसेच विनय सानप, रतनदीप धानू यांनीसुद्धा चांगली चमक दाखवली. सदर स्पर्धेस उषा इंटरनॅशनल कंपनी, अव्हॉन सायकल कंपनी इ. कंपन्यांनी आर्थिक सहाय्य केले आहे. तसेच महाराष्ट्र डेफ क्रिकेट फेडरेशनच्या सहकार्याने असोसिएशनचे अध्यक्ष आशीष गडकरी, खजिनदार शरद पाटणे, माजी वर्ल्ड कप क्रिकेट कर्णधार विवेक मालशे, असोसिएशनचे दीपक जाधव यांनी सदर स्पर्धेसाठी सहकार्य केले.

सायलंट हीरोजकडून महाराष्ट्राच्या हर्षल जाधव याने संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने नाबाद 119 धावांची खेळी साकारताना बियास इलेव्हनविरुद्ध 4 विकेटस् घेतल्या. या त्याच्या कामगिरीमुळे हर्षल जाधव याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला. तसेच हर्षल जाधव याने एकूण चार लढतींमध्ये 219 धावा केल्या. शिवाय 12 विकेटस्ही घेतल्या. यामुळे हर्षल जाधव याची मॅन ऑफ द सीरिज म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याला डॅटस्तान कंपनीची कार बक्षीस म्हणून मिळाली.

आपली प्रतिक्रिया द्या