रोमेनियाची टेनिस क्वीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केदार लेले  । लंडन

विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का बसला. सातवी मानांकित रोमेनियाची सिमोना हॅलेप हिने सेरेनाला दोन सरळ सेटमध्ये पराभूत करून पहिल्या विम्बल्डन विजेतेपदाला गवसणी घातली. तिने सेरेनावर 6-2, 6-2 असा एकतर्फी विजय मिळवला. सामन्यात तिने दोन सेटमध्ये चार गेमच्या मोबदल्यातच सेरेनाला हरविण्याचा पराक्रम केला.

हॅलेपची आक्रमक सुरुवात

पहिल्या आणि तिसऱया गेममध्ये सेरेनाची सर्व्हिस भेदत सिमोनाने डबल ब्रेक मिळवला. केवळ 11 मिनिटांत 4-0 अशा भक्कम आघाडी घेत तिने सेरेनावर चांगलेच दडपण आणले. नंतर तिने सेरेनावर सतत दडपण राखले आणि केवळ 56 मिनिटांतच सामना जिंकला.

अनफोर्स्ड एरर्स वि. विनर्स

सेरेना सतत दडपणाखाली असल्यामुळे तिचे अनफोर्स्ड एरर्स (बळजबरी न करता झालेल्या चुका) इतके वाढत गेले की, जणू सिमोना हॅलेपसाठी सेरेनाने मोफत गुणांची टांकसाळ उघडली होती. दुसरीकडे लक्ष विचलित न होऊ देता सिमोना हॅलेप मिळेल त्या संधीवर उत्कृष्ट विनर्स मारत होती.

सेरेना चाचपडली

लय न सापडल्यामुळे सेरेना चाचपडल्यासारखी टेनिस खेळत होती. त्यात तिच्या सर्व्हिसनेही तिला फारशी साथ दिली नाही. अनेक टेनिसतज्ञांच्या मते विम्बल्डन स्पर्धेअगोदर खूप कमी सामने खेळल्यामुळे सेरेना नसलेला फिटनेस, होणारी दमछाक आणि चाचपडण स्वाभाविक होते. त्या उलट सिमोना मात्र उत्तम तयारीनिशी आली होती आणि तिचा कोर्टवरचा वावर ‘द स्वॉन लेक’मधल्या एखाद्या निर्दोष बॅलरीना बॅले नृत्यासारखा होता. एकाग्रतापूर्ण खेळ आणि निश्चित नियमबद्ध तंत्रातून तिने अनेक टेनिस चाहत्यांची आणि तज्ञांची वाहवा मिळवली.

अंडरडॉग हॅलेपने रचला इतिहास

तृणांगण हा शब्द उच्चारताच पिकनिक हा एकमेक शब्द सिमोना हॅलेपच्या मनाला स्पर्श करतो. म्हणूनच एकाग्रता पूर्ण खेळ करीत विम्बल्डनच्या तृणांगणावर पहिल्यांदाच अंतिम फेरीत हॅलेपने केलेला सेरेनाचा पराभव संस्मरणीय ठरतो. संपूर्ण विश्व जेव्हा सेरेनाच्या 24 व्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाची आस लावून बसले होते तिथे रोमेनियाचे प्रेक्षक मात्र सिमोना हॅलेपच्या पाठी मागे भक्कमपणे उभे होते. एकाग्रतापूर्ण खेळ आणि निश्चित नियमबद्ध तंत्रामुळेच तिने सेरेनासारख्या मातब्बर खेळाडूवर डाव उलटवला आणि तिचे स्वप्न भंग करण्यात यशस्वी झाली.

सेरेनाचे 24 व्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाचे स्वप्न भंगले

मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक 24 विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी साधण्याची संधी सेरेनाला होती, मात्र तिला यात यश आले नाही. या पराभवामुळे सेरेनाची 24 व्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाची आणि पर्यायाने ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्ट यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची प्रतीक्षा नक्कीच लांबली आहे. गतवर्षीही सेरेना विल्यम्सला विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात ऍँजेलिक कर्बरकडून पराभवाचा धक्का बसला होता.

दृष्टिक्षेपात

  • यापूर्वी दहा लढतींत नऊ वेळा हार.
  • आधीचा एकमेव विजय सिंगापूरमधील 2014 च्या डब्ल्यूटीए फायनलमध्ये 6-0, 6-2.
  • ग्रॅण्डस्लॅम स्पर्धांत सिमोना हॅलेप विरुद्ध सेरेना चार लढतींत प्रथमच पराभूत.
  • यापूर्वी विम्बल्डनमध्ये 2011 च्या दुसऱया फेरीत सेरेना 3-6, 6-2, 6-1 अशी विजयी.
  • 2019 विम्बल्डन हे सिमोनाचे कारकीर्दीतील दुसरे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद.
  • 2018 मध्ये फ्रेंच ओपनमध्ये विजेती.