
>> स्वप्नील साळसकर
सिंधुदुर्गात आजही पुरातन विश्वाच्या खाणाखुणा दाखवणारी ठिकाणे आहेत. मात्र समज – गैरसमजुतीमुळे तिथपर्यंत आजही कोणी जाण्यास धजावत नाही. देवगड तालुक्यातील चाफेड, बादेवाडीच्या सडय़ावर एका विवराचा (सिंक होल) शोध विद्यामंदिर हायस्कूल, कणकवलीच्या साहसी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी लावला आहे.
कणकवली शहरात असणाऱया माध्यमिक विद्यामंदिरमधील विज्ञान शिक्षक पृथ्वीराज बर्डे आणि एनसीसी, इतिहास शिक्षक अमोल शेळके नेहमीच साहसी शिबिरे, गिर्यारोहण, पुरातन वास्तूंची शोध मोहीम यांसारखे उपक्रम राबवत असतात. अलीकडेच त्यांना देवगड तालुक्यातील चाफेड बादेवाडीच्या सडय़ावर असणाऱया या गूढ विवराविषयी येथील ग्रामस्थ संतोष पवार यांनी माहिती दिली होती. त्यामुळे या ठिकाणी शोधमोहीम राबवण्याचा निर्णय पक्का झाला होता. शिक्षकांसोबत 11 निवडक विद्यार्थ्यांच्या टीमने दिवसभरात विवरासह आजूबाजूच्या परिसरात फिरून वेगवेगळय़ा ठिकाणांचा अभ्यास केला.
सुरुवातीला सकाळच्या सत्रात डोंगराच्या पायथ्याशी असणारी पांडवांची विहीर पाहिली. येथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही विहीर पाऊस पडायच्या काही दिवस अगोदर भरते. सिंधुदुर्गात जवळपास तीन ठिकाणी अशा विहिरी आहेत. त्यानंतर कातळातील उभी गुहा (सिंक होल) च्या ठिकाणी विद्यार्थी पोहोचले. सावधगिरी बाळगत एनसीसी शिक्षक अमोल शेळके यांनी प्रथम दोरीच्या सहाय्याने या विवरात उतरून पाहणी केली.
या विवराची उंची सरळसोट 25 फूट खोल आणि तळाशी पोहोचल्यावर डाव्या बाजूला 30 फूट रुंद आणि उजव्या बाजूला 15 फूट रुंद जागा आहे. तळाशी गाळ साचला असल्यामुळे बाकी काही शोध घेता आला नाही, परंतु दंतकथेतील या ठिकाणी हे सर्च ऑपरेशन केल्यामुळे ग्रामस्थांच्या मनातील भीतीही कमी झाली. मात्र कणकवली तालुक्यात कोळोशी या ठिकाणी सापडलेल्या गुहेत जशी दगडी हत्यारे सापडली अथवा दक्षिण आफ्रिकेत 60 हजार वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन मानवांचे काही पुरावे हाती लागले तसे काही पुरावे हाती लागू शकतील असाही अंदाज या शोध मोहिमेदरम्यान व्यक्त केला जात होता.
सडय़ावरील हे विवर पांडवांच्या काळातील आहे अशी दंतकथा असली तरी शास्त्रीयदृष्टय़ा प्रचंड पावसामुळे कातळातील क्षार पाण्यात विरघळतात आणि हळूहळू हा खड्डा मोठा होत जातो. विवरात पाऊस पडला तरी त्यात पाणी साचून राहत नाही. त्याचा थेट निचरा होत राहतो आणि तो खड्डा मोठा होतो अशी माहिती अभ्यासातून समोर येते.
धोका पत्करून…
विवरात पालापाचोळा साचून राहिल्यास तो कुजून मिथेन, कार्बनडाय ऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड यांसारखे तयार होणारे वायू धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे गुदमरून बेशुद्ध पडण्याची भीती असते, परंतु या साहसी विद्यार्थ्यांनी सावधगिरी बाळगत ही मोहीम यशस्वी केली. तळाशी पडलेले दगड आणि मोठय़ा प्रमाणात साचलेला गाळ, शिवाय हत्यारे नसल्यामुळे उत्खननही करता आले नाही. त्यामुळे पुरातत्त्व खात्याने या ठिकाणाची पाहणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


























































