मेहनतीचं चीज झालं! महागायिका सन्मिता धापटे-शिंदेने उलगडला प्रवास

सूर नवा ध्यास नवा’मध्ये मी ‘महाराष्ट्राची महागायिका’ हा किताब पटकावला असला तरी त्यामागचा प्रवास सोपा नव्हता. कॉलेजच्या दिवसांपासून मी वेगवेगळ्या रियालिटी शोसाठी ऑडिशन द्यायचे. परंतु कधी शोमध्ये सिलेक्शन झाले नाही. ‘सूर नवा…’ च्या तिसऱया सिजनमध्ये मेगा ऑडिशनमधून मला बाहेर पडावे लागले होते. प्रयत्नानंतरही यश मिळत नसल्याने मी काहीशी निराश झाले होते. हार मानायची नाही अन् प्रयत्न सोडायचे नाहीत… एक ना एक दिवस यश नक्कीच मिळेल, याची खात्री होती. शोचे विजेतेपद मिळवल्यामुळे माझ्या अनेक वर्षांच्या कष्टाचं चीज झाल्याची भावना गायिका सन्मिता धापटे-शिंदे हिने व्यक्त केली.

‘सूर नवा…’च्या प्रवासाविषयी दैनिक ‘सामना’शी बोलताना सन्मिता म्हणाली, आमचे मेंटॉर अजित आणि निखिलेश दोघेही दिग्गज संगीतकार असल्याने संगीतकाराची गाण्याकडे बघण्याची दृष्टी कशी असते हे समजलं. गाणं अजून छान पद्धतीने कसं खुलवता येईल याबाबत परीक्षकांचं मार्गदर्शन मिळायचं. प्रत्येक स्पर्धक वेगवेगळ्या धाटणीची गाणं म्हणणारा असल्यानं  त्यांच्याकडूनही बरंच काही शिकता आलं. एपंदरीत हा प्रवास माझ्यासाठी खूप शिकवणारा होता. महागायिका झाल्यावर आयुष्यात झालेल्या बदलांविषयी ती म्हणाली, यापूर्वीदेखील मी गायचे, वेगवेगळे शोज करायचे. परंतु ‘सूर नवा…’मुळे मला नवी ओळख मिळाली आहे. जिथे जाते तिथे लोक सन्मिताला ओळखू लागले आहेत. आपली कला सर्वांपर्यंत पोहोचावी असं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं, हे स्वप्नं आता पूर्ण झालं आहे.

माझ्यासमोर आता मोकळं आकाश 

आता माझ्यासमोर मोकळं आकाश आहे. अनेक चित्रपट, अल्बमच्या गाण्यांसाठी ऑफर्स येतायत. मनासारख्या ऑफर्स मी निवडतेय. छान विचार करून त्यावर मी कामही सुरू केलंय. गाणं निवडताना ते गाणं मला छान प्रेझेंट करता येईल का, याचा मी आधी विचार करते. ‘सूर नवा…’मुळे वेगवेगळ्या जॉनरची गाणी मला स्टेजवर गाता आली. यापुढेही मला स्वतःला कोणत्याही चौकटीत अडकवायचे नाही, असे सन्मिताने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या