लोअरपरळ वर्कशॉपच्या हेल्थ युनिटचा स्लॅब कोसळला; कामगारांचा केंद्र चर्नीरोडला हलविण्यास विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमधील कर्मचार्‍यांना आपात्कालीन परीस्थितीत औषधोपचार मिळावेत यासाठी महत्वाच्या असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जर्जर झाली असून येथील छताचे स्लॅब कोसळले आहे. त्यामुळे डॉक्टरांसह कर्मचारी व त्यांचे नातलग यांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाने हे आरोग्य केंद्र चर्नीरोड स्थानक येथे हलविण्याची तयारी केली आहे. यास कर्मचार्‍यांनी प्रचंड विरोध केला असून प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात आंदोलन होण्याची शक्यता आहे.

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ येथील वर्कशॉपच्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छताचा भाग कोसळल्याने येथील कर्मचारी आणि त्यांच्या नातलग अशा त्याच्यावर अवलंबून असलेल्या पाचशेहून अधिक कर्मचार्‍यांचा जीव धोक्यात आला आहे. या आरोग्य केंद्राला चर्नीरोड तसेच महालक्ष्मी आणि लोअरपरळ स्थानकाच्या तिकीट बुकींग केंद्रात हलविण्याचा घाट घातला जात आहे. या आरोग्य केंद्राला लोअरपरळच्या हॉस्टेलच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर शिफ्ट करण्याचाही पर्याय होता. येथे पाच इमारती असून केवळ एकाच इमारतीत अधिवास सुरू आहे. इमारत क्र. 25 एलच्या रिकाम्या असलेल्या क्वार्टर्समध्येही क. 26 आणि 29 या लाकडी जिन्याच्या जुन्या इमारती असून त्या एक दोन वर्षांत पाडून त्यांचा पुनर्विकास करण्याची गरज आहे.

नव्या इमारतींचा प्रस्ताव लालफितीत
लोअरपरळ वर्कशॉपच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जर्जर झाली असून ती पाडून तिचा पुनर्विकास करण्यासाठी 20 कोटींची गरज आहे. ही इमारत पाडून तळमजला प्लस आठ तर लोअरपरळ कारखान्यातील पाच इमारतीपैकी एकच इमारत रिकामी असून तिची अवस्था वाईट आहे. या सर्व पाच इमारती पाडून तेथे नव्या आठ मजली इमारती उभारण्यासाठी 30 कोटींची गरज असून हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरी अभावी धुळखात पडून असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

कंटेनरमध्ये आरोग्य केंद्र उघडा
या आरोग्य केंद्रात एक्सरे आणि इतर प्राथमिक उपचार होत असून ते महत्वाचे आहेत, फॅक्टरी अ‍ॅक्ट 1948 नूसार कामाच्या ठिकाणापासून 800 मीटरच्या आत एक्सरे व निदानासह संपूर्ण सुसज्ज आरोग्य केंद्र असणे गरजेचे आहे. तरच गोल्डन अवरमध्ये कर्मचार्‍यांना उपचार मिळतील, त्यामुळे पोटा केबिन किंवा कंटेनर्समध्ये आरोग्य युनिट चालू करावे, अशी मागणी वेस्टर्न रेल्वे एम्लॉईज युनियनचे बँच अध्यक्ष शाम आचरेकर यांनी लोअर परळ कारखान्याचे मुख्य कारखाना प्रबंधकांना पत्र पाठवून केली आहे.