
सोलापूर शहरातील उड्डाणपुलांच्या भूसंपादनाचे काम वेगाने सुरू असून, जुना पुणे नाका ते पत्रकार भवन या ‘फेज-1’मधील उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया येत्या जून अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली.
मागील सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दोन उड्डाणपुलांच्या प्रकल्पाला गती आली आहे. जुना पुणे नाका ते पत्रकार भवनापर्यंत या मार्गावरील उड्डाणपुलासाठीची प्रक्रिया वेगात सुरू आहे. साडेपाच किलोमीटर मार्गाच्या भूसंपादनासाठी एकूण 7 ते 8 टप्पे पाडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवाडा मंजूर करून घेण्यात येत आहे. या मार्गातील शासकीय जागांचा विषय महापालिकेकडे असून भूसंपादन विभागाकडे केवळ खासगी जागांसाठीची प्रक्रिया केली जात आहे. या मार्गावर एकूण 103 खासगी मिळकती आहेत.
पहिल्या टप्प्यातील उड्डाणपुलाचा निवाडा जाहीर करून मिळकतदारांना मोबदला देण्यासाठी जूनअखेरपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून द्यावी, अशा सूचना आयुक्त शीतल तेली-उगले यांनी भूसंपादन विभागाला दिल्या आहेत. एकूण 8 पैकी 4 टप्प्यांची रक्कम भरण्यात आली आहे. उरलेल्या 4 टप्प्यांची रक्कम 30 टक्के भरलेली आहे, असे आयुक्त तेली-उगले यांनी स्पष्ट केले.
उड्डाणपुलासंदर्भात ताबा घेण्याचे काम भूसंपादन विभागाचे आहे. महापालिका प्रशासन केवळ रक्कम भरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चार टप्प्यांचे पैसे भरणा केले असून, त्यासाठी 11.20 कोटी रुपये कर्ज मंजूर झाले आहे. त्यात 4.80 कोटी अनुदानापोटी मिळणार आहेत. एकूण 25 कोटी कर्जाची मागणी केली आहे. त्यात दहा कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे, असेही महापालिका आयुक्तांनी सांगितले. महापालिकेला 30 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. त्याची पूर्तता करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाकडून सोलापूर शहरातील मिळकतवर, नळ कनेक्शन, ड्रेनेज कनेक्शन, प्रॉपर्टी कार्ड या विविध घटकांचा सर्वंकष सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातली नियोजन बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली. या बैठकीमध्ये एकूण किती पथके लागणार आहेत. डाटा एण्ट्री कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यासंदर्भात नियोजन करण्यात येणार असल्याचेही महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत महापालिकेला एकूण 22 कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून दहा कोटी रुपयांचे रस्ते तर उर्वरित 12 कोटी रुपये निधीतून थीम्स करण्यात येणार आहेत. त्यापैकी दहा कोटी निधीतून करण्यात येणाऱ्या रस्त्याचे टेंडरही उघडण्यात आले आहे. पुढील प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील विविध निवडक ठिकाणी कारंजे करण्यात येणार आहेत. तसेच हरितपट्टे तयार करण्यात येत आहेत. यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सांगितले.






























































