
सोलापूर शहरात चोरटय़ांनी हैदोस घातला असून, महिलांना लक्ष्य करत तीन घटनांमध्ये 11 लाख रुपयांचे दागिने चोरीस गेले आहेत.
लक्ष्मी अंबादास कंदीकटला (रा. न्यू पाच्छा पेठ), वैशाली विक्रम काटुळे (रा. सातरस्ता, जुळे सोलापूर), शोभा चंद्रकांत क्षीरसागर (रा. वारद फार्म ग्रीन अपार्टमेंट) अशी महिलांची नावे आहेत.
लक्ष्मी कंदीकटला या शहरातील एका शाळेच्या मुख्याध्यापिका असून, त्या कुटुंबीयांसह घर बंद करून देवदर्शनाकरिता परगावी गेल्या होत्या. चोरटय़ांनी त्यांचे बंद घर फोडून कपाटातील सोन्याच्या अंगठय़ा, लगड, मंगळसूत्र, चेन, लक्ष्मीहार, कानातील मकरकुंद, टॉप्स, मोतीहार आणि चांदीचे बिस्किट, 45 हजार रुपयांची रोकड असे सुमारे 9 लाख 91 हजार रुपयांचे दागिने लुटून नेले आहेत. जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
दुसरी घटना जुळे सोलापुरातील म्हाडा कॉलनी येथे घडली आहे. वैशाली काटुळे या स्कूटरवरून मुलीला क्लासला घेऊन जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले आहे. यावेळी चोरटय़ांनी काटुळे यांना दुखापत केली असून, यात मुलगी व आई दोघी जखमी आहेत.
तिसरी घटना जुना पूना नाक्याजवळ घडली असून, शोभा क्षीरसागर या मुलीला शाळेतून घरी घेऊन जात असताना जुना पूना नाक्याजवळील स्मशानभूमी रोडवर दोघा तरुणांनी गाडी अडवत पिस्तुलाचा धाक दाखवून 90 हजार रुपये किमतीची चेन हिसकावून नेली. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.






























































