सोशल मीडियावर एकत्र येता तर जाती, पाण्यावरून भांडणे का करता?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। सोलापूर

फेसबुक, व्हॉटस्ऍप या सोशल मीडियावर एकत्र येता तर जात आणि पाण्यावरून भांडणे का करता, असा सवाल करीत शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देश घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमात केले. त्यांच्या आवाहनाला उपस्थित तरुणाईने टाळ्यांच्या कडकडाटात जोरदार प्रतिसाद दिला. हा संवाद तुमचे प्रश्न समजावून घेऊन सोडविण्यासाठी आहे. तुम्ही हाक मारा, जरुर मदत करू. आजच्या तरुण पिढीकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. समाज बदलायचा असेल तर त्याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी चांगले शिक्षण, तरुणाच्या हाताला काम आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱया टप्प्याला बुधवारी सोलापूर जिह्यातून उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. आदित्य ठाकरे यांचे मुंबईहून सकाळी सोलापुरात आगमन झाले. त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर आदित्य ठाकरे यांनी वालचंद महाविद्यालयात तरुणांशी संवाद साधला. आपल्या अभ्यासपूर्ण आणि रोखठोक वक्तव्यांनी त्यांनी तरुणाईची मने जिंकली. सोलापुरातील स्थानिक प्रश्नापासून ते राज्याच्या विविध प्रश्नांबाबत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी आपल्या शैलीत उत्तरे देत हजारो तरुणांची मने जिंकली.

वालचंद महाविद्यालयात आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले तेव्हा उपस्थितीत विद्यार्थी-विद्यार्थिंनीनी एकच जल्लोष केला. या वेळी आदित्य ठाकरे म्हणाले, तुमचा एवढा आवाज आहे की, मला आता काही बोलायची गरज नाही. हा तुमचा आवाज दबलेला असतो… बघू, कोणाचा आवाज जोरात येतो… मुलांचा की मुलींचा, अशा शब्दांत उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करीत आदित्य ठाकरे म्हणाले, तुमचे प्रश्न समजून घेण्यासाठी मी हा ‘आदित्य संवाद’ कार्यक्रम घेतोय.

शिक्षण आणि नोकरी ही काळाची गरज आहे आणि ते देत असताना आपण जात बघून देतो, असा प्रश्न एका विद्यार्थिनीने विचारला. त्यावर आदित्य ठाकरे यांनी 2012मधील एका अनुभवाचे उदाहरण दिले. जव्हार-मोखाडा भागात 2012मध्ये पाण्याचे टँकर घेऊन गेलो होतो. तेथे पाणीटंचाई होती. पाणी टाकताना तेथे एक विहीर नव्हती. दोन जातीच्या दोन विहिरी होत्या. त्या वेळी मी लोकांना विचारले, फेसबुक, व्हॉट्सऍप किती जणांकडे आहे? त्यावर सर्वांनी हात वर केले. मग विचारले, पाणी किती जणांकडे आहे? कोणीच हात वर केला नाही. फेसबुकवर सगळे एकमेकांच्या फ्रेंडलिस्टमध्ये होते. मात्र पाण्यासाठी विहिरी दोन होत्या. तेथे कोणीच कोणाचे फ्रेंड नव्हते. देश म्हणून ही खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आपण आपल्या मूलभूत गरजांसाठी एकत्र येत नाही. जर आपण फेसबुकवर एकत्र असतो, पब्जीवर एकत्र असतो, टिकटॉकवर एकत्र असतो तर पिण्याच्या पाण्यासाठी, जातीवरून शिक्षण, नोकऱयांसाठी भांडणे का होतात असेही ते म्हणाले.

जशी गाय असते तशी माय असते
महाराष्ट्रात होत असलेल्या गोहत्या बंदीबाबत एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘जशी गाय आहे तशी मायदेखील आहे. गाईला आणि माईला जो हात लावेल, त्याला शासन झालेच पाहिजे,’’ असेही त्यांनी सांगितले. राज्यातील तरुणाईला भेडसावणारे प्रश्नही यानिमित्ताने विचारले गेले. त्यासही आदित्य ठाकरे यांनी खास शैलीत उत्तर दिले तेव्हा उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जल्लोष केला आणि तुमच्या सोबत आहोत, असा निर्धार केला. या वेळी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत, सचिन अहिर, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, पूर्वेश सरनाईक, सिद्धेश कदम यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते

स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करा
शिवसेनेच्या वतीने ‘बाळासाहेब ठाकरे आयएएस ऍकॅडमी’च्या वतीने एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले जाते याचाही फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केले. आयपीएस, आयएएस अधिकाऱयांच्या हातात जेवढी ताकद असते तेवढी राजकारणात नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नक्कीच स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी उपस्थित तरुणांना सांगितले.

जातीला पोट असते, मात्र पोटाला जात नसते
शिक्षण आणि नोकरीच्यानिमित्ताने जातीचा प्रश्न सातत्याने विचारला जातो. याबाबत एका विद्यार्थ्यांनीने विचालेल्या प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनी समर्पक उत्तर दिले. जातीय व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. माझे आजोबा नेहमी सांगायचे, जातीला पोट असते, मात्र पोटाला जात नसते, असे आदित्य ठाकरे यांनी सांगताच उपस्थित तरुणाईने टाळ्यांचा कडकडाट केला.