
सामना ऑनलाईन । कोलकाता
टीम इंडियातील धडाकेबाज फलंदाज महेंद्र सिंग धोनी याच्या निवृत्तीबाबत सध्या क्रिकटवर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या विश्वचषकानंतर धोनी निवृत्ती घेणार असल्याचे देखील बोलले जात आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी माजी कर्णधार सौरव गांगुली याला विचारले असता त्याने धोनीचा खेळ चांगला असेल तर त्याने वयाचा विचार करून निवृ्त्ती घेऊ नये, असे मत मांडले आहे.

गेल्या वर्षी महेंद्र सिंग धोनी याचा खेळ चांगला झाला नव्हता. धोनीने 2018 मध्ये 13 डावात 25 च्या सरासरीने फक्त 275 धावा केल्या होत्या. त्यामुळे अनेकदा क्रिकेटच्या चाहत्यांनी धोनीने निवृत्ती घेतली पाहिजे अशी मागणी केली होती. मात्र 2019 मध्ये धोनी सूर गवसल्यासारखा खेळू लागला आहे. 2019 मध्ये आतापर्यंत सहा डावात धोनीच्या बॅटमधून 301 धावा निघाल्या आहेत. यात तो चार वेळा नाबाद राहिला आहे. त्याने या धावा 150 च्या सरासरीने चोपल्या आहेत, तर त्याचा स्ट्राईक रेट आहे 80.26. यात त्याने चार अर्धशतकं ठोकली आहेत.विश्वचषकापूर्वी पुन्हा एकदा धोनीचा खेळ बहरला असल्याने हिंदुस्थानचे पारडे नक्कीच जड झाले आहे.
MUST WATCH – The @msdhoni aura in Ranchi
In this video capsule, we try to capture the euphoria around MS Dhoni in the dressing room & his aura in his hometown in Ranchi – by @28anand
https://t.co/CtSlWl1i8H pic.twitter.com/VudCr9VbIo
— BCCI (@BCCI) March 7, 2019
याबाबत सौरव गांगुलीला प्रसारमाध्यमांनी विचारले असता त्याने वय हा मुद्दा महत्त्वाचा नसून खेळ महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. ‘धोनी विश्वचषकानंतरही खेळू शकतो. जर हिंदुस्थानने विश्वचषक जिंकला आणि धोनीने सातत्याने चांगली फलंदाजी केली तर त्याला निवृत्ती घेण्याची काय गरज? वय हा मुद्दा नसून त्याच्यातील कौशल्य महत्त्वाचे आहे, असे गांगुलीने सांगितले.

धोनी संघामध्ये फक्त फलंदाज, यष्टीरक्षक म्हणून उपस्थित नसतो, तर तो कोहलीचा मार्गदर्शक म्हणूनही उभा असतो. बऱ्याचदा डीआरएस घेताना देखील विराट गोलंदाज डीआरएस घ्या म्हणत असला तरी धोनीचा सल्ला घेतो आणि आजपर्यंत त्याचा हा सल्ला नेहमीच योग्य राहिल्याचे आपण पाहिले आहे. 2018 हे वर्ष खराब गेल्यानंतर धोनीने 2019 मध्ये दणदणीत खेळ केला आहे. ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानने मिळवलेल्या ऐतिहासिक मालिका विजयात धोनी चमकला. या मालिकेत धोनीने 51, नाबाद 55 आणि नाबाद 87 धावांसह एकून 193 धावा चोपल्या. या कामगिरीमुळे धोनीला मालिकावीरचा पुरस्कार मिळाला.

























































