दक्षिण मुंबईतील वर्ल्ड हेरिटेज वास्तू लखलखणार… तेरा दगडी इमारतींवर रंगीबेरंगी प्रकाशाची उधळण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश चुरी

ब्रिटिशकालीन ठेवा असणाऱया आणि आता जागतिक वारसा वास्तूचा दर्जा मिळालेल्या दक्षिण मुंबईतील तब्बल तेरा ऐतिहासिक वास्तू रंगीबेरंगी प्रकाशझोतात न्हाऊन निघणार आहेत. मुंबई हायकोर्टाची बुलंद वास्तू त्याचप्रमाणे पोलीस महासंचालकाचे कार्यालय अशा तेरा वास्तूंवर कायमस्वरुपी रोषणाई करण्यात येणार आहे.

राज्याच्या पर्यटन संचलनालयाने काही वर्षीपूर्वी सीएसटीच्या इमारतीवर नेत्रदीपक रोषणाई केली. रंगबिरंगी दिव्यांनी सीएसटीची वर्ल्ड हेरिटेज वास्तू (जागतिक वारसा) उजळून निघाली आहे. त्याच धर्तीवर मुंबईतील तेरा वर्ल्ड हेरिटेज वास्तूंवर विद्युत रोषणाई करण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्याच्या पर्यटन संचलनालयाने (डीओटी) आखली आहे. या योजनेसाठी तब्बल 28 कोटी 71 लाख 67 हजार रुपये खर्च करण्यात येतील.

आदित्य ठाकरे यांचा पुढाकार

पर्यटन संचालनालयाने सीएसटीवर रोषणाई केली. त्यानंतर मुंबई महापालिकेनेही मुख्यालयाच्या इमारतीवर रोषणाई केली. या दोन्ही ऐतिहासिक इमारती उजळून निघाल्यानंतर पर्यटकांची पावले आपसूक या वास्तूंकडे वळली. सेल्फी पॉइंट म्हणून तरुणाईचे आवडते ठिकाण ठरले. पर्यटकही मोठय़ा संख्येने वळले. हा प्रतिसाद पाहिल्यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ऐतिहासिक वास्तूंवर रोषणाई करण्यासाठी पुढाकार घेतला असे राज्याच्या पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर म्हणाले.

या ऐतिहासिक वास्तूंवर रोषणाई

मुंबई उच्च न्यायालयाची इमारत, हायकोर्टाच्या बाजूला असलेली पीडब्ल्यूडीची इमारत, सिटी सिव्हिल कोर्ट, एल्फिन्स्टन इस्टिटय़ूट, महापालिका मुख्यालयाच्या शेजारील मेट्रोपोलिटीन मॅजिस्ट्रेट कोर्ट, पोलीस महासंचालक इमारत, सायन्स इस्टिटय़ूट, मुंबई विद्यापीठाचा पदवीदान हॉल, गेट वे ऑफ इंडिया, जीपीओ व अन्य इमारती संध्याकाळी साडेसहाच्या नंतर प्रकाशझोतात न्हाऊन निघतील.

मार्चपर्यंत वास्तू उजळणार
या योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. आता तांत्रिक मंजुरीही मिळेल. टेंडर काढून 1 डिसेंबरपासून काम सुरू करण्याची योजना आहे. रोषणाईचे काम पूर्ण होण्यास साधारणपणे चार महिन्यांचा कालावधी लागेल. पुढील मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याची योजना असल्याचे डॉ. धनंजय सावळकर म्हणाले.

अशी होईल दिव्यांची आरास
या इमारतींच्या मूळ रंगाशी मिळतीजुळती रोषणाई केली जाईल. इमारतीवरील नक्षीकामानुसार काही ठिकाणी प्रखर दिवे, काही ठिकाणी मंद दिवे प्रकाश फेकतील. या ऐतिहासिक इमारतींवर मोठय़ा प्रमाणावर दगडी कोरीव काम व नक्षीकाम आहे. या नक्षीकामावर मंद रोषणाई केली जाईल. एखाद्या विशिष्ट दिवसासाठी रंगांची थीम केली जाईल. म्हणजे 15 ऑगस्टला तिरंग्यातील रोषणाईने इमारत उजळून निघेल. जयपूरमध्ये अशा प्रकारे ऐतिहासिक इमारतींवर रोषणाई केली आहे.