सोयाबीन खरेदीची ऑनलाईन नोंदणी 1 ऑक्टोबर, तर हमी भावाने खरेदीला 15 ऑक्टोबरपासून सुरुवात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हंगाम 2020-21 मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी 1 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. खरेदीला सुरुवात 15 ऑक्टोबर 2020 पासून होणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

मंत्री बाळासाहेब म्हणाले, केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे सोयाबीन हमी भाव 3 हजार 880 रुपये  असा जाहीर केला आहे. चालू हंगामात सोयाबीनची आवक बाजारात सुरु झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी 1 ऑक्टोबर 2020 पासून नोंदणी प्रक्रिया सुरु होत आहे.

नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार सोयाबीन खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीकरिता आधारकार्डाची छायांकिंत प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा. तसेच शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर नोंदवावा.

केंद्र शासनाकडे हमीभावाने सोयाबीन खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव 18 सप्टेंबर 2020 ला पाठविण्यात आला होता. त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.