
समर्थ रामदासांच्या संप्रदायातील संत कवयित्री संत बयाबाई, ज्या संत वेणाबाईंच्या शिष्या होत्या. गिरीधरस्वामी हे बयाबाईंचे शिष्य होते. गिरीधर स्वामींनी ‘समर्थ प्रताप’मध्ये अकराव्या समासात ‘बाइयाबाई’ असा त्यांचा उल्लेख केला आहे. वेणाबाईंनी संस्थानाचे अधिकार ‘मठपती’ म्हणून बयाबाईंकडे सोपवले होते. बयाबाईंना उर्दू भाषेचे चांगले ज्ञान होते. आपल्या वयाच्या 80-85 वयापर्यंत त्यांनी रचना केल्या. त्यांच्या रचनांमध्ये स्वतच्या नावाचा उल्लेख असे. बयाबाईंच्या राम, कृष्ण यांच्यावरी आधारित अनेक रचना आढळतात. उर्दू भाषेच्या ज्ञानामुळे त्यांनी काही अभंग हिंदीतही लिहीले. त्या रचना लक्षवेधी आहेत. ‘क्या कहू गुरूनाथ की बात में। मस्तमया है दिल मेरा रंग मे।।’ त्यांनी लिहीलेली गवळण म्हणजे स्वतशीच साधलेला संवाद होता. बयाबाईंनी विरहीणी देखील रचल्या. वाचताना त्यातील चपखल भाव जाणवतो. ‘चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी। कान्हे वनमाळी वेगी भेटवावा इथे।।’ बयाबाईंच्या कूट अभंगरचना, उर्दू भाषेतील ज्ञान तसेच आरत्यांची अर्वाचीन भाषा हे वैशिष्ट्यपूर्ण होते.






























































