
लॉकडाऊनच्या काळात मिळालेला वेळ आणि त्याला मिळालेली चिंतनशील कलानिर्मितीची साथ यांच्या जोरावर युवा चित्रकार श्वेता गौतम यांनी अनोखी रेखाटने केली आहेत. लॉकडाऊन अनुभूतीवर आधारित ही चित्रमालिका बघण्याची संधी कलारसिकांना मिळाली आहे. श्वेता गौतम यांचे ‘लॉकडाऊन स्टोरीज’ प्रदर्शन काळाघोडा येथील जहांगीर कलादालनात सुरू आहे. 14 फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत प्रदर्शन विनामूल्य बघता येईल.
श्वेता गौतम हिने जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून कलाशिक्षण घेतले आहे. लॉकडाऊनच्या काळात श्वेताने नित्य जीवनातील अनुभूतींवर आधारित चित्रे काढली आहेत. मानवी मनातील परस्पर संबंध नातीगोती जपण्याचा अट्टहास, बाहेरील जगाशी व शेजाऱयांशीही संपर्क जवळजवळ नष्ट झाल्याने पूर्णपणे एका ठिकाणी बंदिस्त राहून आपल्या कल्पना व विचार तसेच जगात वेगवेगळ्या ठिकाणी घडणाऱया घटना, अद्भुतरम्य अनुभव यांची कलात्मक सांगड श्वेताने घातली आहे. पेन व पेपर लाइन आर्ट वर्क वापरून साकारलेल्या चित्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.


























































