खास पोह्यांसाठी भाताची नवीन जात, कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनाला दहा वर्षांनी यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मंडणगड

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील शेतकऱयांसाठी यावर्षी कर्जत शताब्दी ही भाताची नवीन जात विकसित केली आहे. मुख्यत्वे या नवीन भाताच्या व्हरायटीपासून उत्तम प्रकारच्या पोह्यांची निर्मिती होऊ शकेल. त्यामुळे भाताचे मूल्यवर्धन होणार आहे.

कर्जत येथील भाताचे बोटवेल या स्थानिक वाणापासून ही जात विकसित करण्यात आली आहे. मूळ स्थानिक जात ही उंच वाढत असल्याने शेतात लोळून या भाताचे नुकसान होत होते. मात्र नव्याने विकसित करण्यात आलेल्या या जातीचे वाण उंच होत नसल्याने नुकसान होत नाही. बोटवेल या भाताच्या स्थानिक जातीवर रेडिएशन करून जवळपास आठ ते दहा वर्षे संशोधन करून ही नवी जात विकसित करण्यात आली आहे.

मोदकासाठी उत्तम पीठ
कर्जत शताब्दी हा तांदूळ खास पोह्यांसाठी उपयुक्त ठरणार असून यापासून मोदकाचे पिठही उत्तम प्रकारचे होऊ शकते. रायगड, कर्जत, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग, फोंडाघाट व काही शेतकऱयांच्या प्रक्षेत्रावर या नवीन जातीची गेली दोन वर्षे लागवड करून निरीक्षणाअंती संशोधन करून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून जात विकसित करण्यात आली आहे.