पूर्वांचल द्रुतगती मार्गावर BMW आणि कंटेनरची धडक, 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केलेल्या उत्तरप्रदेशातील पूर्वांचल द्रुतगती मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. पूर्वांचल द्रुतगती मार्गावर शुक्रवारी BMW कार आणि कंटेनर यांच्यामध्ये जोरदार धडक झाली. हि धडक इतकी भीषण होती की कार मधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. पूर्वांचल द्रुतगती मार्गावरील सुलतानपूर येथे खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी हा अपघात घडला. कंटेनरला धडकल्यानंतर बीएमडब्ल्यू कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि युपीडाच्या पथकाने घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. हलियापूर पोलीस स्टेशन हद्दीतील KM 83.750 येथे ही घटना घडली.

ही कार सुलतानपूर येथून जात होती आणि त्याच रस्त्यावर लखनौकडून येणाऱ्या कंटेनरने कारला जोरदार धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. ही धडक इतकी भीषण होती की कारचे इंजिन आणि आत बसलेले चारही जण दूरवर फेकले गेले. यात एका व्यक्तीचे डोके शरीरापासून वेगळे झाले होते. या कारचा क्रमांक UK 01C 0009 असून ती उत्तराखंडची असल्याचे सांगण्यात येत आहे. कारच्या क्रमांकावरून मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हलियापूर पोलीस ठाण्यापासून थोड्या अंतरावर रस्ता खचल्याने मोठा खड्डा तयार झाला होता. गेल्या गुरुवारी मुसळधार पावसानंतर KM 83 वर 5 फूट खोल आणि 15 फूट रुंद रस्त्यावर खड्डे पडले होते. ज्यात एक कार अडकली होती. अतिवेग हे अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. मृत पावलेले सर्वजण उत्तराखंडचे रहिवासी आहेत.