
स्पाईस जेटच्या विमानांना तांत्रिक बिघाडाचे ग्रहण लागले आहे. मंगळवारी एका दिवसात दोन विमानांनी इमर्जन्सी लँडिंग केले. दिल्लीहून दुबईला निघालेले विमान इंधन इंडिकेटरच्या बिघाडामुळे कराचीत उतरावे लागले. त्यानंतर पुढच्या काही तासांतच 23 हजार फूट उंचीवर विंडशिल्डला तडे गेल्यामुळे दुसऱया विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग केले गेले. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मंगळवारी सकाळी स्पाईस जेटचे एसजी-11 हे विमान दिल्लीहून दुबईला जात होते. अर्ध्या प्रवासात फ्यूएल टँकच्या इंडिकेटरवर विमानाचे इंधन वेगाने कमी होत असल्याचे दिसले. तपासणीनंतर टँकमध्ये कुठेही लिकेज दिसले नाही, मात्र इंडिकेटरवर पुन्हा इंधन कमी झाल्याचे दाखवण्यात आले. इंडिकेटरच्या या बिघाडामुळे दुबईला चाललेले विमान प्रवासी सुरक्षेच्या कारणास्तव आपत्कालीन परिस्थितीत कराचीला उतरवण्यात आले. त्यानंतर दुपारी गुजरातच्या कांडलाहून मुंबईला येणारे विमान हवेत 23 हजार फूट उंचीवर असताना विंडशिल्डच्या बाहेरील भागाला मोठे तडे गेले. त्यामुळे अपघाताच्या भीतीने त्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. दोन्ही घटनांतील सर्व प्रवासी व क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत, असे स्पाईस जेटच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
17 दिवसांमध्ये सातव्यांदा बिघाड
स्पाईस जेटच्या विमानांमध्ये मागील 17 दिवसांत सातव्यांदा तांत्रिक बिघाडाची घटना घडली आहे. त्यामुळे या एअरलाइन्सच्या विमानांच्या सुरक्षेचा मुद्दा नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या (डीजीसीए) रडारवर आला आहे. मंगळवारी घडलेल्या दोन घटनांसह सर्व सातही घटनांची ‘डीजीसीए’कडून सखोल चौकशी केली जात आहे.
यापूर्वी घडलेल्या पाच घटना
19 जून – पाटणा येथून 185 प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेल्या विमानाच्या इंजिनला आग लागली.
19 जून – जबलपूरसाठी उड्डाण घेतलेल्या विमानाच्या केबिनमध्ये प्रेशर वाढले. त्यामुळे त्या विमानाला दिल्लीला माघारी परतावे लागले.
24 जून – गुवाहाटीहून कोलकात्याला निघालेल्या विमानाच्या वॉनिंग लाइट्समध्ये बिघाड झाला.
25 जून – पाटणा विमानतळावर विमानाच्या फ्यूजलेज डोअर वॉनिंग लाइटमधील बिघाडामुळे उड्डाण रद्द केले.
2 जुलै – दिल्लीहून जबलपूरला निघालेले विमान पाच हजार फूट उंचीवर असताना केबिनमधून धूर निघाला.


























































