जिंकेल त्याला उपांत्य फेरी गाठण्याची आशा! श्रीलंका-अफगाणिस्तान यांच्यात अस्तित्वाची झुंज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विठ्ठल देवकाते

श्रीलंका आणि अफगाणिस्तान या डार्क हॉर्स संघांमध्ये उद्या सोमवार, 30 ऑक्टोबरला पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या मैदानावर क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये अस्तित्वाची झुंज रंगणार आहे. जगज्जेत्या इंग्लंडला या दोन्ही संघांनी पराभवाचा धक्का दिलेला आहे. श्रीलंका अन् अफगाणिस्तानने पाच-पाच लढतींत दोन-दोन विजय मिळविले असून त्यांच्या चार-चार लढती अद्यापि शिल्लक आहेत. त्यामुळे उभय संघांमधील जो संघ विजयाची लय राखेल त्याला उपांत्य फेरी गाठण्याची आशा असेल.

फलंदाजांचा धमाका की गोलंदाजांची बाजी?
गहुंजे स्टेडियमवर यंदाच्या वर्ल्ड कपमधील दुसरा सामना सोमवारी रंगणार आहे. याआधी हिंदुस्थान-बांगलादेश यांच्यामध्ये या मैदानावरील पहिला वर्ल्ड कप सामना झाला होता. येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आहे. येथे झालेल्या आठ एकदिवसीय लढतीत आठ वेळा संघांनी तीनशे धावांचा टप्पा ओलांडलेला आहे. त्यामुळे श्रीलंका-अफगाणिस्तानमध्ये उद्या हाय स्कोरिंग सामना बघायला मिळू शकतो, मात्र या मैदानावर फिरकी गोलंदाजांचीही जादू चालण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांकडे दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे पुण्यातील मैदानावर फलंदाजांचा धमाका बघायला मिळणार की गोलंदाज बाजी मारणार, याबद्दल उत्सुकता आता टिपेला पोहोचली आहे.

…तरीही अफगाणिस्तान सरस
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंका व अफगाणिस्तान हे संघ नऊ वर्षांत 11 वेळा आमने-सामने आलेले आहेत. यात सात वेळा श्रीलंकेने बाजी मारली असून अफगाणिस्तानने केवळ तीन विजय मिळविले आहेत. वर्ल्ड कपमध्ये उभय संघ दोन वेळा भिडले असून त्यात श्रीलंकेनेच बाजी मारलेली आहे, मात्र यावेळी अफगाणिस्तानचा संघ थोडा सरस वाटतो. कारण त्यांचा गोलंदाजी ताफा श्रीलंकेपेक्षा तगडा आहे. राशीद खान व नूर अहमद या प्रतिभावान फिरकी जोडगोळीमुळे अफगाणिस्तानचे पारडे जड वाटते. त्यांचे फलंदाज चालले तर मग श्रीलंकेचे काही खरे नाही. शिवाय इंग्लंड व पाकिस्तान या बलाढय़ संघांना धूळ चारल्यामुळे अफगाणिस्तानचे मनोबल नक्कीच उंचावलेले असेल. त्यामुळे श्रीलंका विजयाची हॅटट्रिक साजरी करणार की अफगाणिस्तान वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक विजय मिळविणार याकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील.

उभय संभाव्य संघ
अफगाणिस्तान : रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), मोहम्मद नबी, इक्रम अली खिल, राशिद खान, फजल हक फारुकी, नवीन उल हक, नूर अहमद.

श्रीलंका : कुसल परेरा, पथुम निसांका, कुसल मेंडिस (कर्णधार), धनंजया डि’सिल्व्हा, चरिथ अस्लांका, एंजेलो मॅथ्यूज, लाहिरू कुमारा, महेश थिक्षाना, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेलालागे, दिलशान मधुशंका.