
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सभ्य लोकांचा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिले जाते. परंतु मॅच फिक्सिंग आणि चेंडूसोबत छेडछाड केल्याच्या घटनांमुळे या खेळाला डाग लागत आहे. शनिवारी चेंडूसोबत छेडछाड केल्याच्या वादावरून वेस्ट इंडिज आणि श्रीलंका संघातील दुसरा कसोटी सामना मध्येच लटकला होता. पंचांनी चेंडू बदलल्याने नाराज झालेल्या श्रीलंकन खेळाडूंनी तिसऱ्या दिवशी मैदानावर उतरण्यात नकार दिला. त्यामुळे तब्बल दोन तास सामना उशिराने सुरू झाला.
सामन्यादरम्यान चेंडूची स्थिती खराब झाल्याने मैदानावरील पंच आलिम दार आणि इयान गाऊल्ड यांनी तो बदलण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी वेस्ट इंडिजचा संघ श्रीलंकेच्या २५३ धावांच्या बदल्यात दोन बाद ११८ अशी सुस्थितीमध्ये होता. पंचांच्या निर्णयाचा विरोध करताना श्रीलंकन खेळाडूंनी मैदानावर न उतरण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकन खेळाडू त्याच चेंडूपासून खेळ सुरू ठेवण्याची मागणी करत होते.
दरम्यान, श्रीलंकन खेळाडूंच्या असभ्य खेळामुळे सामना मध्येच लटकला होता. या वादावर तोडगा काढण्यासाठी मॅच रेफरी जवागल श्रीनाथ, श्रीलंकेचे प्रशिक्षक चंडिका हथुरासिंघे आणि टीम मॅनेजर असांका गुरुसिंघा यांच्यात चर्चा झाली. एक वेळ सामना पुन्हा सुरू होणार की नाही यावरही शंका उपस्थित झाली. परंतु चर्चेनंतर श्रीलंकन खेळाडू चेंडू बदलण्यासाठी आणि खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी तयार झाले आणि सामना पुन्हा सुरू झाला. या दरम्यान श्रीलंकेचा दंड म्हणून वेस्ट इंडिजच्या धावसंख्येमध्ये पाच अतिरिक्त धावा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
२००६ मध्येही असेच झाले होते…
यापूर्वी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त एकदाच एका संघाने मैदानावर उतरण्यास नकार दिला होता आणि सामना पूर्ण होऊ शकला नव्हता. २००६ मध्ये इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये ओव्हल मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात पंच बिली डाक्ट्रोव आणि डेरेल हेअर यांनी चेंडूसोबत छेडछाड केल्याचा आरोप करत पाकिस्तानला पाच धावांचा दंड ठोठावला होता. पंचांच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या पाकिस्तानी संघाने चौथ्या दिवशी चहापानानंतर मैदानावर उतरण्यास नकार दिला. त्यामुळे पंचांनी इंग्लंडला विजयी घोषित केले.


























































