
श्री विठ्ठल मंदिरात वसंत पंचमीच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात दुपारी 12 वाजून 17 मिनिटांनी संपन्न झाला. ‘या पंढरपुरात काय वाजतं गाजतं, सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागलं….’ या गाण्यावर उपस्थितांनी ठेका धरला. प्रजासत्ताक दिन आणि देवाचा विवाह सोहळा एकत्रित आल्याने पंढरी नगरी गजबजली होती.
वसंत पंचमीच्या मुहूर्तावर मंगळवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याची लगीनघाई सुरू होती. विठ्ठल मंदिरातील सभामंडपात भव्य मंच सजविला होता आणि त्याला आकर्षक फुलांची सजावट केली होती. प्रजासत्ताक दिन असल्याने तिरंग्याची आरास साकारण्यात आली होती. तसेच विठ्ठल, रखूमाईचा गाभारा विविध प्रकारच्या रंगीत, सुगंधीत फुलांनी लग्नघरासारखा सजविला होता. एरवी टाळ-मृदंग आणि विठ्ठलाच्या नामघोषाने गजबजणाऱ्या मंदिरात मंगळवारी मंगल अक्षता, सनई चौघडे आणि उपस्थित वऱ्हाडी मंडळी यांची लगबग सुरू होती. बाहेर सोन्याचे वाशिंग बांधून देवाचे लग्न लावण्यासाठी शेकडो वऱ्हाडी उपस्थित होते.
रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यातून श्री विठ्ठलाकडे गुलाल नेला आणि तिथे गुलालाची उधळण केली. त्यानंतर विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणीमातेकडे नेऊन तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची अलंकाराने सजविलेली उत्सवमूर्ती सभामंडपात विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आणण्यात आली.
हा विवाह सोहळा दिमाखदार करण्यासाठी संपूर्ण मंदिर आणि गाभारा झेंडू, शेवंती, गुलाब, निशिगंध, एथोरियम, ऑरकेड, कामिनी, तगर, अष्टर, बिजली, ग्लॅडीओ, जरबेरा, ड्रेसेना, तुळशी, इतर प्रकारच्या आकर्षक फुलांनी सजविला होता. सकाळी 11 वाजता श्री विठ्ठल आणि रुक्मिणीला शुभ्र वस्त्र, मोत्याचे दागिने, नथ, हिरवा चुडा आणि शुभ्र अलंकाराने सजविले गेले. विठ्ठलासही पांढऱ्या शुभ्र वस्त्राने व सुवर्णालंकारांनी सजविले होते.
यावेळी दोन्ही देवतांना मुंडावळ्या बांधल्या, अंतरपाट धरला. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या उपस्थितीत विवाह लावण्यात आला. उपस्थित वन्हाडी मंडळींना अक्षता वाटप केल्यानंतर मंगलाष्टके झाली. कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी मंगलाष्टके म्हटली. उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी विवाह झाल्यानंतर आनंदाच्या भरात मंडपात सुरु असलेल्या या पंढरपुरात काय वाजतं गाजतं, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं, या गाण्यावर ठेका धरला.
या विवाह सोहळ्यास मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, मंदिर समिती सदस्य आदी उपस्थित होते. विवाह सोहळ्यानंतर वऱ्हाडी मंडळींसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भोजनाची व्यवस्था केली होती.